रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील गारखेडा येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने काकाचा निर्घृण खून करून तो अपघात असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, रावेर पोलिसांनी अत्यंत वेगवान, वैज्ञानिक आणि कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या काही तासांत या खुनाचा उलगडा करून आरोपीला अटक केली. या कारवाईमुळे रावेर पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पाल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गारखेडा येथे रामा थावरू बारेला (वय ४६) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत नाल्याजवळ आढळून आला. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीत मृताच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत आढळून आल्याने पोलिसांनी संशय व्यक्त करत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळावरील भौतिक पुरावे, तांत्रिक माहिती, स्थानिक नागरिकांकडून मिळालेली माहिती तसेच गोपनीय सूत्रांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविली. तपासादरम्यान मयताचा सख्खा पुतण्या अनिल जखा बारेला (वय २९, रा. गारखेडा, ता. रावेर) याच्यावर संशय बळावला. चौकशीत मयत व आरोपी यांच्यात जमिनीच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू असल्याचे निष्पन्न झाले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, २१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता आरोपीने घराजवळच लाकडी काठीने काका रामा थावरू बारेला यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरापर्यंत ओढत नेऊन पायवाटेजवळील नाल्याच्या कडेला टाकला, जेणेकरून हा अपघाती मृत्यू असल्याचा आभास निर्माण होईल.
मात्र घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर संशयित अनिल जखा बारेला याला २२ जुलै २०२६ रोजी ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने अत्यंत तत्परता, उत्कृष्ट समन्वय आणि कौशल्य दाखवत काही तासांत गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीला अटक करण्यात यश मिळविले.



