सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झालेल्या तांदलवाडी परिसराचे सुपुत्र तथा लोकप्रिय नेतृत्व आ. नंदकिशोर (नंदूभाऊ) विमलबाई भागवत महाजन यांच्या सन्मानार्थ तांदलवाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य ग्राम सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्रीहरी सभागृह, श्री दत्त मंदिर संस्थान, तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) येथे संपन्न होणार आहे.
या भव्य सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन भूषविणार आहेत. तसेच केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिल पाटील आणि आमदार अमोल पाटील यांच्या शुभहस्ते आ. नंदूभाऊ महाजन यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई वाघ, आमदार किशोर अप्पा पाटील, आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), माजी आमदार राजाराम महाजन, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे तसेच जळगावच्या महापौर दिपमाला काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तांदलवाडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा सत्कार सोहळा परिसरासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आ. नंदूभाऊ महाजन सत्कार समिती आणि समस्त तांदलवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.



