साकेगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लोकनेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या स्मृतीस अनोखी मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या सामाजिक, विकासाभिमुख आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचा उल्लेख करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र (नाना) पाटील यांनी आपल्या मनोगतात स्व. अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. “कामाचा माणूस हरपला, आमच्यासारख्या अनेकांचा आधार होता दादा,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत स्व. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांचे स्मरण केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय बॅग व विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी स्वागत केले. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला प्राधान्य देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र (नाना) पाटील, साकेगावचे माजी सरपंच अनिल पुंडलिक पाटील, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन दिलीपसिंग पाटील, माजी सरपंच तथा व्हाइस चेअरमन संजय गोविंदराव पाटील, जोगलखेडा-भानखेडा येथील सरपंच पंकज पाटील, गोजरा येथील सरपंच लक्ष्मण सपकाळे, कंडारी येथील ज्येष्ठ नेते ॲड. धनराज मगर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत कोलते, विकास सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य अनंत सोनवणे, डॉ. कैलास ठाकरे, पिंटू हळप, सुरेश पाटील, योगेश भोई, विनोद कोळी, किशोर सोनवणे, सोपान पाटील, अनिल लक्ष्मण पाटील, संजय पाटील, अमोल मांडे, निलेश जाधव, रूपेश बाविस्कर, शामराव रामदास मोरे, छोटू रामदास पाटील, योगेश नरोटे, मंजूर खाटीक, राकेश मराठे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण चौरे यांनी केले. प्रभारी मुख्याध्यापिका सुषमा नेमाडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नंदू सपकाळे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शबनम देशमुख तसेच उर्दू शाळेचे मुख्याध्यापक तबकसूम पटेल यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.



