यावल प्रतिनिधी । असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या येथील महर्षी व्यास मंदिरात सालाबादाप्रमाणे साजरा होणारा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत साध्या व सरळ पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. मंदिरातील महापूजेचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार असून या माध्यमातून भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
गुरूपौर्णिमेनिमित्त रविवारी सकाळी आठ ते दहा वाजे पावेतो महर्षी व्यास मंदिरात महापूजा करण्यात येणार आहे. याचे थेट प्रक्षेपणाद्वारे, फेसबुकच्या माध्यमातून भाविकांना आपल्या घरात बसून दर्शन घेता येईल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणीही व्यास मंदिरात दर्शनासाठी येऊ नये. सर्व भाविक भक्तांनी फेसबुक, व व्हाट्सअॅप ग्रुप वर महर्षी व्यास महाराजांचे दर्शन घ्यावे असे आवाहन श्री व्यास मंदिर व श्रीराम मंदिर संस्थान समिती यावल यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून येथे शहरात दक्षिणेस सूर नदीकिनारी उंच टेकडीवर स्थानापन्न असलेल्या महर्षी श्री व्यास मंदिरात गुरु (व्यास) पौर्णिमेनिमित्त राज्यातून व इतर राज्यातून लाखो भाविक महर्षी श्री व्यास महाराजांच्या दर्शनासाठी येथे येत असतात. मंदिरात येणार्या भाविकांसाठी येथे मसालेभात व बुंदीचा महाप्रसाद दरवर्षी वितरीत होत असतो. गुरु पौर्णिमेनिमित्त काही सामाजीक, राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांकडून बसस्थानक ते मंदीर अशी दर्शनास येणार्या भाविकांसाठी मोफत रिक्षा आदी वाहनांची व्यवस्था केली जाते. शहरात मंदिराकडे जाणारे रस्ते गर्दीने फूलून जातात. गुरुपौर्णिमे च्या निमित्ताने बहुतेकांकडे बाहेरगावाहून पाहुणे मंडळी आलेली असते. मंदिरावर दर्शनासाठी लांब रांगा असतात. गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास मंदिरासह संत जनार्दन बाबा आश्रम, गजानन महाराज मंदिर, साईबाबा मंदिरातही भाविकांची गर्दी असते.
यावर्षी मात्र कोरोना विषाणूच्या आपात्कालीन महामारीमुळे महर्षी व्यास मंदिरासह शहरातील सर्वच मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव अगदी साध्या पध्दतीने साजरा केला जाणार आहे. महर्षी व्यास मंदिर विश्वस्त समितीने भाविकांसाठी महापूजेचे थेट प्रक्षेपण, फेसबुक, व्हाट्स अॅपद्वारे उपलब्ध करुन देत असल्याने भाविकांनी मंदिरात येऊ नये. आपल्या घरीच बसून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी कोरोनाविषाणू च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू केली असून नागरिकांनी व भाविकांनी शासनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आवाहन विठ्ठल प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, यावलचे तहसीलदार जितेंद्र कुवर, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत बर्हाटे यांनी केले आहे.