मलेशियाने चीनच्या सहा जहाजांना घेरले

क्वालालंपूर: वृत्तसंस्था । दक्षिण चीन समुद्रात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मलेशियाने चीनच्या सहा जहाजांना घेरले असल्याचे समोर आले आहे. चीनचे हे जहाज मलेशियाच्या हद्दीत जाणूनबुजून मासेमारी करत होते.

नंतर मलेशियाच्या नौदलाने कारवाई करत या जहाजावरील ६० चिनी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच इंडोनेशियाच्या नौदलानेदेखील चिनी जहाजांना हुसकावून लावले होते.

मलेशियातील पूर्व भागातील राज्य जोहोरच्या किनाऱ्याजवळ ही कारवाई करण्यात आली. चीनचे सर्व जहाज क्विनहंगडाओ बंदरात नोंदणीकृत करण्यात आले होते. मलेशियाच्या समुद्र हद्दीत २०१६ ते २०१९ मध्ये चीनच्या जहाजांनी जवळपास ८९ वेळा घुसखोरी केली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर मलेशियाने आपल्या समुद्र हद्दीत गस्त वाढवली होती.

दक्षिण चीन समुद्रावरील चीनचा दावा मलेशियाने याआधीच फेटाळून लावला आहे. संयुक्त राष्ट्र संघात मलेशियाच्या प्रतिनिधींनी २९ जुलै रोजीच संयुक्त राष्ट्र महासचिवांना पाठवलेल्या पत्रात चीनचा दावा फेटाळून लावला. दक्षिण चीन समुद्रातील मोठ्या भागावर चीन आपला दावा सांगत आहे. मलेशियाने पाठवलेल्या पत्रात म्हटले की, दक्षिण चीन समुद्रात समुद्र सुविधांसाठी चीन करत असलेल्या दाव्यांना आतंरराष्ट्रीय कायद्यानुसार कोणताच आधार नाही.

दक्षिण चीन समुद्राच्या ९० टक्के भागांवर चीन आपला दावा सांगतो. या समुद्र हद्दीच्या मुद्यावर चीनचा फिलिपीन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि व्हिएतनामसोबत वाद आहे. पूर्व चीन समुद्रात जपानसोबत बेटांच्या हद्दीवरून वाद सुरू आहे.

मागील महिन्यातच इंडोनेशियाने चीनच्या गस्ती पथकाच्या जहाजाला नातुना बेटाजवळून हुसकावून लावले होते. हा भाग इंडोनेशियाच्या विशेष आर्थिक भागात येतो. नातूना बेटांजवळ चीनच्या मासेमारी करणाऱ्या नौका कायम दिसतात. चिनी सरकारकडून या नौका आपला दावा सांगण्यासाठीच पाठवल्या जात असल्याचे म्हटले जाते. या नौकांच्या संरक्षणासाठी चिनी गस्ती पथकाच्या नौका असतात. हा कावा लक्षात आल्यानंतर इंडोनेशियाने आपल्या नौसेनेची गस्त वाढवली.

Protected Content