केवळ लसीमुळे करोनावर मात करणे शक्य नाही : टेड्रोस यांच्या दाव्याने संभ्रम

नवी दिल्ली वृत्तसंस्था । एकीकडे कोरोनावरील लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या असतांनाच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेसेस यांनी केवळ लसीमुळे कोविड-१९ वर मात करणे अशक्य असल्याचे प्रतिपादन करून खळबळ उडवून दिली आहे.

लस स्वतः करोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी केला आहे. टेड्रोस म्हणाले, करोनाशी लढण्यासाठी इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणून काम करेल. मात्र, त्यांची जागा घेऊ शकणार नाही. केवळ लस ही स्वतः ही महामारी संपवू शकत नाही. विषाणूचे अस्तित्व येत्या काळातही कायम राहणार आहे. त्यामुळे लोकांच्या चाचण्या होणं, त्यांना क्वारंटाइन करणं, ट्रेसिंग आणि फिजिकल डिस्टंसिंग पाळणं आवश्यक असणार आहे.

टेड्रोस म्हणाले, सुरुवातीला करोनावरील लस पुरवठा हा मर्यादित असेल. त्यामुळे ही लस आरोग्य कर्मचारी, वृद्ध लोक आणि इतर जोखीम असणार्‍या लोकांना प्राधान्य दिले जाईल. यामुळे मृत्यूची संख्या कमी होईल आणि आरोग्य यंत्रणेला करोनाशी लढण्यास मदत होईल.

गेल्या काही महिन्यांत जगभरात करोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले असून या विषाणूने ५४ दशलक्ष लोकांना संक्रमित केले आहे. तर सुमारे १.३ दशलक्ष लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर अवघ्या जगाचं लक्ष करोनाच्या लशीकडे लागलेलं असताना या विधानामुळं संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

Protected Content