जळगाव प्रतिनिधी । अंगणवाडी सेविकांना मराठीत पोषण आहार ट्रॅकर न दिल्यास बहिष्कार सुरूच ठेवण्याचा इशारा जिल्हापरिषद समोर करण्यात आलेल्या धरणे आंदोलन प्रसंगी देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील अंगणवाडीतील ३ ते ६ वयाचे लाभार्थी व गरोदर व स्तनदा ० ते ३ वयोगटातील लाभार्थ्यांना आहार दिला जातो. याची माहिती मोबाईलद्वारे भरतांना इंग्रजी भाषेत भरावी लागत असल्याने आठवी ते नववी पर्यंत मराठी शिक्षित सेविकांची दमछाक होत आहे. मानसिक स्वास्थ्य ढासळत आहे. तसेच वेळ व पैसे खर्च द्यावा लागत आहे म्हणून पोषण आहार ट्रॅकर मराठीत हवे, पण केंद्र सरकारचे अधिकारी इंग्रजी माहिती भरण्याची सक्ती करणारे परिपत्रक या राज्यात पाठवत आहेत. याबाबत राज्य शासनाने सदर ट्रॅकर मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी निर्णय घ्यावा. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मातृभाषेत उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरावा म्हणून जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, पाचोरा शहर, एरंडोल, जामनेर तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनिसांनी जिल्हापरिषद समोर धरणे आंदोलन करत इंग्रजी सक्ती विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड अमृत महाजन, प्रेमलता पाटील यांनी केले. या आंदोलनात लता सपकाळे, रेखा अहिरे, सुनंदा पाटील, निशा येवले, कविता सोनवणे, संगीता पाटील, संध्या सोनार, रंजना मराठे, चंद्रकला बारी, दीपिका बारी, नंदा वाणी, श्याम वाणीसह तीस ते पस्तीस सेविका मदतीस हजर होत्या.यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी रफिक तडवी यांना निवेदन देण्यात आले. अॅप मराठीत उपलब्ध करून दिले नाही तर कामाची नोंद रजिस्टर वर लिहून इंग्रजी ट्रॅकर करण्यावर बहिष्कार सुरूच राहील असा इशारा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनने दिला आहे.