मराठा क्रांती मोर्चातर्फे कराडात विद्यार्थी परिषदेचे आयोजन

कराड वृत्तसंस्था ।– मराठा क्रांती मोर्चाकडून बुधवारी विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात अशी विद्यार्थी परिषद प्रथमच कराडात होत असून शैक्षणिक प्रवेश अथवा नोकरीच्या ठिकाणी मराठा विद्यार्थ्यांवर होणार्‍या अन्यायाबाबत या परिषदेत विचारविनिमय होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात ९ सप्टेंबरला मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळाली. केंद्र सरकारसह राज्य शासनाने योग्य भूमिका न मांडल्यानेच ही वेळ आल्याचा दावा संपूर्ण राज्यात मराठा बांधवांकडून केला जात आहे. कराड तालुक्यात यापूर्वी मराठा समाज बांधवांनी केंद्र सरकारसह राज्य शासनाचा निषेध नोंदवत तीव्र आंदोलन केले आहे.

या विषयावर विद्यार्थी परिषदेचे आयोजन करून शैक्षणिक प्रवेश, नोकर्‍या या ठिकाणी मराठा विद्यार्थ्यांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. त्यानुसार बुधवार, ३० सप्टेंबरला दुपारी तीन वाजता ही विद्यार्थी परिषद घेण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांना आपल्यावरील होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे.

मलकापूर (कराड) येथील सोनाई मंगल कार्यालयात दुपारी तीन वाजता ही परिषद होणार आहे. विद्यार्थी परिषदेत विद्यार्थ्यांची गार्‍हाणी जाणून घेत भविष्यात कोणती भूमिका घ्यायची ? हे या विद्यार्थी परिषदेत निश्‍चित केले जाणार आहे.

Protected Content