मनपा कोविड सेंटरच्या जेवणाबाबत महापौरांनी केली तक्रार!; आयुक्तांना पाठवले पत्र

जळगाव, प्रतिनिधी । शहर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा घसरला असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या तक्रारी येत असून संबंधित मक्तेदाराला नोटीस बजवावी आणि त्याचे देयक रोखवे, असे पत्र महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.

मनपा कोविड केअर सेंटरच्या जेवणाबाबत रुग्णांकडून तक्रारी येत असल्याने महापौर सौ.भारती सोनवणे स्वतः त्याठिकाणी जेवण करत होत्या. महापौर स्वतः येत असल्याने जेवणाचा दर्जा सुधारला होता परंतु गेल्या आठवड्यात महापौरांच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांनी घरीच राहण्याचे ठरविले.

दरम्यान, महापौर दररोज फोनवरून रुग्णांशी संवाद साधत असल्याने जेवण आणि नाश्ताबाबत रुग्णांच्या तक्रारी वाढू लागल्या. गेल्या काही दिवसात जेवण शिळे येणे, फळे सडकी असणे, नाश्ता, चहा वेळेवर न मिळणे, जेवणाचा दर्जा निकृष्ट असणे अशा तक्रारी रुग्णांनी केल्या होत्या.

तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्त सतिष कुळकर्णी यांना पत्र दिले आहे. मनपा कोविड केअर सेंटरचा मक्ता दिलेल्या मक्तेदाराला जेवणाच्या दर्जाबाबत सक्त ताकीद द्यावी आणि त्याच्या देयकातून नियमानुसार कपात करावी, असे महापौरांनी सुचविले आहे.

Protected Content