जळगाव, प्रतिनिधी । शहर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये अँटीजन टेस्ट किटचा साठा संपला असून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता तात्काळ अँटीजन टेस्ट किट उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी महापौर सौ.भारतीताई सोनवणे यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना केली. ना.पाटील यांनी तात्काळ याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना सूचना दिल्या.
जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका कक्षाच्या उदघाटनप्रसंगी महापौर सौ.भारतीताई सोनवणे यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे उपस्थित होते. जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ७५ हजार अँटीजन टेस्ट किट उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी महापौर सौ.सोनवणे यांनी केली होती. काही दिवसांपूर्वी जळगाव मनपासाठी ४५०० किट उपलब्ध झाल्या होत्या. दररोज २०० वर संशयीत रुग्णांची तपासणी होत असल्याने पंधरा दिवसात त्या किट संपल्या आहेत. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता तात्काळ नव्याने अँटीजन टेस्ट किट उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी महापौरांनी केली. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी लागलीच किट उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना सूचना केल्या.