मनपाचा १२९१ कोटी ७६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायीत मंजूर

 

जळगाव, प्रतिनिधी । महापालिका प्रशासनाने मांडलेल्या सन २०१९-२० चे सुधारित व सन २०२०-२१ चे मूळ अंदाज पत्रकावर आज स्थायी समितीत चर्चा करण्यात आली. स्थायी समिती सभापती एड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ११४१ कोटीच्या अंदाजपत्रकात १५४ कोटी ९० लाख रुपयांची वाढीव तरतूद करून १२९१ कोटी ७६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.

प्रशासनाने सुचविलेल्या मालमत्ता कर ५३ कोटीत २७ कोटीची तरतूद केली होती. मात्र, शहरातील घरांची संख्या व बांधकाम वाढलेले असल्याने प्रशासनाची तरतूद कमी आहे. तसेच स्थापत्य कन्सल्टंट, अमरावती या कंपनीस सर्वेक्षणाचे काम दिलेले आहे. सर्वक्षण पूर्ण झालेले असून केवळ सुनावणी बाकी आहे. ही सुनावणी तातडीने घेऊन नवीन सर्वक्षणानुसार मागणी बिले अदायगी केल्यावर त्यात २७ कोटींची वाढ होऊन ८० कोटी वसूल होऊ शकतात असे निदर्शनास आणून देत वाढ सुचविली. नगर रचना ९ कोटीत १० कोटीची वाढ करून १९ कोटी करण्यात आले. घरे दुकाने गाळा भाडे १ कोटी वरून १८ कोटींची वाढ करून १९ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान (रस्ते प्रकल्प) ५ कोटी १० लाखांची तरतूद करण्यात आली होती. ती ९४ कोटी ९० लाखांनी वाढवून १०० कोटी करण्यात आले. प्रशासनाने ६७ कोटी ७६ लाखांचे अंदाजपत्रकात एकूण १५४ कोटी ९० लाखांची वाढ करून ते २२३ कोटींचे करण्यात आले आहे. शहरातील महापालिका मालकीचे एकमेव नाट्यगृह असलेले बालगंधर्व खुले नाट्यगृह असून ते बरेच वर्षांपासून दुर्लक्षित आहे. त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालवतेच आहे. या नाट्यगृहात पिण्याची पाण्याची, लाईटची नीट व्यवस्था नसून स्टेजची दुरावस्था झालेली आहे. त्याचे पुनरुज्जीवीकरण आवश्यक असतांना प्रशासनाने यावर शून्य म्हणजेच कोणतीही तरतूद केलेली नसून ती ५० लाख करण्यात आली आहे. सार्वजनीक उद्याने बगिचे शुशोभिकरण करण्यासाठी प्रशासनाने १ लाखांची तरतूद केली होती ती ४ कोटी ९९ लाख रुपयांनी वाढवून ती ५ कोटी करण्यात आली आहे. यात मेहरूण येथील शिवाजी उद्यान येथे जळगाव जिल्हा वैशिष्ठ दर्शन थीम पार्क, बोटॉनिक गार्डन, बटरफ्लाय गार्डन आदी विकसित करणेसाठी फस्ट फेज म्हणून ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नगरसेवक निधीत प्रशासनाने ८० लाखांची तरतूद केलेली असून प्रति नगरसेवक १ लाखाची तरतूद केली आहे. हि तरतूद वाढवून ३ कोटी २० लाख करण्यात आली आहे म्हणजे प्रति नगरसेवक ५ लाख करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र खाते उघडण्यात येणार असून यात ४ कोटी जमा करण्यात येणार आहे. रस्ते व्यवस्था व दुरुस्तीसाठी प्रशासनाने ५ कोटीची तरतूद केली होती. शहरातील रस्त्यांची दुरावस्था पाहता हि तरतूद तोकडी असल्याने रस्ते व्यवस्था व दुरुस्तीसाठी १० कोटी वाढवून १५ कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. क्रिडा व सांस्कृतीक विभाग अंतर्गत प्रशासनाने शून्य तरतूद केली होती. जळगावात देखील राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद प्राप्त केलेले खेळाडू आहेत. या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी मागील वर्षी केलेली ५० लाखांची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण मंडळ क्रिडा स्पर्धा व योग प्रशिक्षण अनुदानासाठी प्रशासनाने १ लाखांची तरतूद केली होती त्यात ४ लाख वाढ करून ५ लाखांची तरतूद करण्यात आली.

प्रभाग समिती कार्यालय बनणार मिनी मंत्रालय
मनपातील केंद्रीकृत खुला भूखंड विभागाचे प्रभाग समिती निहाय विभागणी करण्यात येऊन विकेंद्रीकरण करण्यात येणार असल्याचे सभापती हाडा यांनी सांगितले. तसेच नागरिकांना त्यांच्या सोयी सुविधांसाठी महापालिकेच्या प्रशासकीय कार्यालयात यावे लागत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, लाईट विभाग व पाणीपुरवठा विभाग तसेच घरपट्टी विभाग, खुला भूखंड विभाग, अग्निशमन विभाग, अतिक्रमण विभाग आदी विभाग प्रभाग अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली करण्यात येणार आहे. यातून नागरिकांना सुविधा प्राप्त होणार आहे. दरम्यान, पिंप्राळा परिसरात मनपाचे अद्यावत रुग्णालय नसल्याने तेथील सोमाणी मार्केटच्या पहिल्या मजल्यावर मनपाचे सुसज्ज रुग्णालय निर्माण करण्यासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

गो कचरा गो कचरा – लढ्ढा

घनकचरा व्यवस्थेच्या नावाखाली नागरिकांकडून २ टक्के अतिरिक्त कर आकारला जात असल्याचा आरोप शिव सेनेचे सदस्य नितीन लढ्ढा यांनी केला. शहरात कधी नव्हे ऐव्हढी घाण झाली आहे. ५ वर्षासाठी जवळपास ७२ कोटी इतकी रक्कम खर्च करून देखील शहरात स्वच्छता दिसत नाही. यात कोणाचे हित जोपासले जात आहे असा प्रश्न लढ्ढा यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले ज्याप्रमाणे गो करोना गो करोना म्हणतात त्याच धर्तीवर शहरातील नागरिकांना एकत्रित करून ‘गो कचरा गो कचरा’ गायला हवे असे उपरोधिकपणे सभागृहातपणे सांगितले.

 

Protected Content