भोपाळ वृत्तसंस्था । मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारला पाठींबा देणारे काही आमदार भाजपच्या गोटात दाखल झाल्याची माहिती समोर आल्याने येथे राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सत्ताधारी काँग्रेस आघाडीतले आठ आमदार मंगळवारी मध्यरात्री हरयाणातल्या मानेसरमधल्या एका हॉटेलमध्ये पोहोचले. या आठ आमदारांपैकी चार आमदारांनी कमलनाथ सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला आहे. तर एक काँग्रेस आमदार दिग्विजय सिंह यांच्या गटातला आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भाजपा नेते नरोत्तम मिश्रा आणि माजी गृह मंत्री भूपेंद्र सिंह आमदारांना पैशांचं आमिष दाखवत असल्याचा गंभीर आरोप दिग्वीजय सिंह यांनी केला आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी काल सकाळीच ट्वीट करुन भाजपाचे माजी मंत्री भूपेंद्र सिंह आमदार रमाबाई यांना चार्टर्ड विमानानं दिल्लीला गेल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस, समाजवादी, बसपाच्या आमदारांना दिल्लीला नेण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू असल्याचा उल्लेखही त्यांनी ट्वीटमध्ये केला होता. यानंतर त्यांनी सकाळी भाजपने आमदारांना ओलीस धरल्याचा आरोप केला आहे. तर यानंतर त्यांनी सहा आमदार काँग्रेससोबत असल्याचा दावा केला आहे.