एकमेकांचा सन्मान हिच आपली संस्कृती – प्राचार्य डॉ. फालक

भुसावळ प्रतिनिधी। आज स्पर्धेचे युग आहे. प्रत्येक व्यक्ती यशस्वी होण्यासाठी धडपड करीत आहे. परंतु एकमेकांशी स्पर्धा करता करता एकमेकांचा सन्मान करणे गरजेचे आहे. सन्मानानंतर मिळालेल्या यशाचा आनंद चिरकाल टिकणारा असतो. एकमेकांचा सन्मान हिच आपली संस्कृती असल्याचे प्रतिपादन दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी. फालक यांनी येथे केले.

भुसावळ येथील ज्ञानासह मनोरंजन गृपतर्फे आयोजित गौरव सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सीए प्रा.दिनेश राठी, माजी प्राचार्य बी.आर. पाटील, प्रा.दिलीप ललवाणी, डॉ. रघुनाथ कश्यप उपस्थित होते.

प्रास्ताविकातून अमितकुमार पाटील यांनी समारंभ आयोजनाचा हेतू सांगितला. सेवानिवृत्त व विविध पदांवर निवड झालेल्या व्यक्तींना गौरवपत्र, मोत्याची माळ व पुष्प देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. गौरवपत्राचे वाचन नयना महाजन व प्रा.उमाकांत पाटील यांनी केले.

गौरवार्थींचा परिचय डॉ. शुभांगी राठी, शैलेंद्र वासकर, शैलेंद्र महाजन, वसंत सोनवणे, प्रा. शाम दुसाने, अमितकुमार पाटील, हेमांगिनी चौधरी, जीवन महाजन, अशोक तायडे, मनिषा ताडेकर, राजेंद्र जावळे यांनी करून दिला. सेवानिवृत्तीबद्दल प्रा.दिनेश राठी, प्रा.दिलीप ललवाणी, डॉ.रघुनाथ कश्यप यांचा तर विविध पदांवर निवड झाल्याबद्दल प्रमोद आठवले (समता परिषद जिल्हाध्यक्ष), संजय ताडेकर (पर्यवेक्षक), प्रा.शैलेश राणे (जुक्टो जिल्हाध्यक्ष), नाना पाटील (ग्राहक मंच जिल्हा सचिव), संजीव बोठे (मुख्याध्यापक), डि.के.पाटील (पर्यवेक्षक), संजू भटकर (मानवाधिकार विभागाध्यक्ष), प्रदीप सोनवणे (शिक्षक संघटना समन्वयक) व समाधान जाधव (कॉस्ट्राईब तालुकाध्यक्ष) यांना सन्मानित करण्यात आले.

प्रा.दिनेश राठी, प्रा.दिलीप ललवाणी, प्रा.शैलेश राणे, संजू भटकर यांनी सत्कारार्थी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.आर.पी. फालक यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.श्रीकांत जोशी यांनी तर आभार डॉ.जगदीश पाटील यांनी मानले.

Protected Content