तरुणांनो, ग्राहक नव्हे तर विक्रेते व्हा – प्रांताधिकारी डॉ. थोरबोले

यावल प्रतिनिधी । भारत हा तरुणांचा देश असून माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांनी आपल्यातील कलागुणांचा वापर केल्यास कुण्या व्यावसायिक संस्थांचे ग्राहक नाही तर आपल्या बुध्दीच्या जोरावर विक्रेते बनू शकाल, असे प्रतिपादन फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावेत. याकरीता प्रधानमंत्री जिल्हास्तरीय मुद्रा योजना समन्वय व प्रचार समितीतर्फे यावल तालुकास्तरीय मेळावा २८ रोजी फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय येथे पार पडला. या मेळाव्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. अजीत थोरबोले बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, पंचायत समिती सदस्य कलीमा तडवी, सरफराज तडवी, योगेश भंगाळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, यावल तहसीलदार जितेंद कुंवर, पं.स.चे गटविकास अधिकारी निलेश पाटील, फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर चौधरी,महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी आनंद विद्याधर, डांभुर्णीचे सरपंच पुरजीत चौधरी आदि उपस्थित होते.

  डॉ. थोरबोले पुढे म्हणाले की, तरुणांच्या हाती आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे मोबाईलवर सोशल मिडीयाचा वापर करतांना आपण न कळत कोणाचे तरी ग्राहक बनत असतो. तरुणांनी हेच तंत्रज्ञान अवगत करुन आपल्या बुध्दीचातुर्यांच्या जोरावर विविध ॲप तयार करुन आधुनिक तंत्रज्ञानाचे विक्रेता बनू शकता. देशाला महासत्ता बनविण्यासाठी बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे. त्यांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये प्रगती करता यावी. याकरीता प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा तरुणांनी लाभ घेऊन आपली व आपल्या कुटूंबाची आर्थीक व सामाजीक प्रगती करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती विशद केली. तसेच जिल्ह्यातील तरुणांना या योजनेचा अधिकाधिक लाभ घेता यावा याकरीता जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मेळावे घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यांचा नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी या मेळाव्यामध्ये शासनाच्या इतर योजनांचीही माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नागरीकांनी आपण ज्या योजनेसाठी पात्र ठरु शकतो त्या योजनेची माहिती घेऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी यावल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी. बी. संदानशीव यांनी शासनाच्या उमेद या योजनेची तर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी आनंद विद्याधर यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

यावेळी डांभुर्णीचे सरपंच पुरजीत चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या मेळाव्याच्या ठिकाणी शासनाच्या कृषि विभाग,जिल्हा उद्योग केंद्र, समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, कौशल्य विकास विभाग, महिला व बालविकास, विविध राष्ट्रीयकृत बँका तसेच शासनाचे अंगिकृत व्यवसाय असलेली विविध विकास महामंडळांचे स्टॉलही लावण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.या मेळाव्यास सुशिक्षित बेरोजगार तरुण, बचतगटाच्या महिला, स्वयंरोजगार करु इच्छिणारे तरुण व्यावसायिक, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content