मतलबी खाजगी कंपन्यांचा डॉक्टरांच्या विम्याला नकार

नगर वृत्तसंस्था । कोविड ड्युटीशी संबंधित डॉक्टरांची विमा पॉलिसी उतरविण्यास अनेक खासगी कंपन्या नकार देत आहेत. नगरमधील भूलतज्ज्ञ डॉ. सचिन लांडगे यांनी असे प्रकरण उघडकीस आणले आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून अनेक विमा कंपन्यांच्या टर्म इन्श्युरन्सच्या जोरदार जाहिराती सुरू असल्या तरी कोरोना योद्धयांना मात्र याचा लाभ देण्यास कंपन्या नकार देत आहेत.

सचिन लांडगे यांनी एक अनुभव सांगितला एका मित्राने सुचविले म्हणून डॉ. लांडगे यांनी एका खासगी कंपनीच्या पॉलिसीसाठी ऑनलाइन अर्ज केला. माहिती भरली, कागदपत्रे जोडली, पैसेही भरले. नंतर काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांनी चौकशी केली असता त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात आले. तुम्ही घेतलेली योजना अस्तित्वात नसल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. योजना अस्तित्वात नव्हती, तर ऑनलाइन दिसत कशी आहे, अर्ज भरले कसे जात आहेत, असे प्रश्न डॉ. लांडगे यांना उपस्थित केले.

मधल्या काळात त्यांना आणखी एका खासगी विमा कंपनीची माहिती मिळाली. ही कंपनी विश्वासार्ह असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी तेथेही अशाच पद्धतीने अर्ज केला. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पंधरा दिवसांनी त्यांना सांगण्यात आले की, त्यांना पॉलिसी नाकारण्यात आली आहे. याचे कारणही मोठे विचित्र देण्यात आले होते. याआधी एका कंपनीने पॉलिस नाकारल्याने आम्हीही ती नाकारत आहोत, असे त्यांना सांगण्यात आले.

हे न पटल्याने डॉ. लांडगे यांनी एजंटांना संपर्क करून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वेगळीच माहिती उजेडात आली. अर्ज भरताना त्याता कोविड ड्युटीशी संबंधीत प्रश्न होते. त्याची उत्तरे डॉ. लांडगे यांनी सकारात्मक दिली होती. म्हणजे ते कोविड रुग्णांवर थेट उपचार करीत असल्याचे म्हटले होते. याच कारणाने दोन्ही खासगी कंपन्यांना त्यांना पॉलिसी नाकरली होती, मात्र कारण स्पष्ट सांगितले जाते नव्हते.

यावर डॉ. लांडगे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. याचा अर्थ जे कोविड ड्युटी करत आहेत किंवा ज्यांची भविष्यात कोविड ड्युटी लागू शकते, अशा कोणत्याही फिजिशियन आणि इंटेनसिव्हिस्ट डॉक्टरला नवीन टर्म इन्श्युरन्स पॉलिसी मिळणारच नाही का? मी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर असलो तरी एप्रिल-मेमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये लागलेली कोविड ड्युटी मी केली आहे. आता आमच्या अशा ड्युटी बंद झाल्या आहेत. आता कोविड संपेपर्यंत आम्हाला कोणी टर्म इन्श्युरन्स देणारच नाही का? एकतर डॉक्टरांचे पगार मिळत नाहीत, कित्येकांचे पगार अर्धेच मिळत आहेत. त्यात कित्येक सोसायटीत डॉक्टरांना राहू देत नव्हते, घरमालक डॉक्टरांना घर खाली करायला सांगत होते. सोशल मीडियातून अपप्रचार सुरू आहे. ना सरकार त्यांची काळजी वाहतेय, ना समाज त्यांना जवळ करतोय. अशा परिस्थितीत केवळ “कोविड योद्धा” म्हणायचे, पण सुविधा तर राहूच द्या, पण त्यांना त्यांच्या मरणाची किंमत द्यायला सुद्धा नकार द्यायचा, याला काय अर्थ आहे?, अशी उदविग्नता लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content