मग शिवसेनेबरोबर जाऊन राज्याचे हित कसे साधणार? ; शिवसेनेचा भाजपला सवाल

मुंबई (वृत्तसंस्था) स्वतः फडणवीस, नड्डा वगैरे लोक शिवसेनेला स्वार्थी, अपयशी वगैरे दूषणे देत आहेत. मग शिवसेनेबरोबर जाऊन राज्याचे हित कसे साधणार?, असा सवाल शिवसेनेने भाजपला ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारला आहे.

 

अग्रलेखात म्हटले आहे की, “विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे व राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडावे हे योग्यच आहे. विरोधी पक्ष जितका आक्रमक व सावध तितके सरकारचे काम पारदर्शक होत असते. त्यादृष्टीने नड्डा यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला दिलेल्या सूचनांचे स्वागत करायलाच हवे. खरे तर नड्डा यांनी हे सांगण्याचीही गरज नव्हती. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नड्डा यांना आडवे जाणारे बालिश वक्तव्य केले. राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय? भाजपला मुख्यमंत्रीपद मिळाले तरच राज्याचे हित, अन्यथा नाही. दुसरे असे की स्वतः फडणवीस, नड्डा वगैरे लोक शिवसेनेला स्वार्थी, अपयशी वगैरे दूषणे देत आहेत. मग शिवसेनेबरोबर जाऊन राज्याचे हित कसे साधणार? पाटील यांनी एक मान्य केले पाहिजे की, राज्यात सध्या जी व्यवस्था सुरु आहे ती शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे व ती व्यवस्थाही राज्याच्याच हिताची आहे! भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात त्यांनी राहू नये” असा इशारा सामनाच्या अग्रलेखात दिला आहे.

Protected Content