मथुरा (वृत्तसंस्था) राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भूमिपूजनासाठी हजर असणारे राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नित्य गोपाळ दास यांची अचानक प्रकृती खालवल्यामुळे खळबळ उडाली आहे.
महंत नित्य गोपाळ दास जन्माष्टमीनिमित्ताने मथुरा इथे ते कार्यक्रमासाठी आले असताना अचानक त्यांना त्रास होऊ लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या आठवड्यात अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला महंत नृत्यगोपाल दास हजर होते. यावेळी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संपर्कात आले होते. दरम्यान, एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्यगोपाल दास यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. दरवर्षीप्रमाणे महंत नित्य गोपाळ दास जन्माष्टमीनिमित्तानं मथुरेत आले होते. सोहळ्यादरम्यान त्यांना अचानक श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. त्यांनी तातडीने डॉक्टरांना बोलवण्यास सांगितले. प्रकृती बिघडल्यानंतर तातडीने सीताराम आश्रमात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. करोनाच्या पार्श्वभूमीवर ठराविक लोकांनाच कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. मंचावरही फक्त पाच लोकांनाच परवानगी होती. यामध्ये महंत नृत्यगोपाल दास यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील हजर होते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यावेळी अनेकदा महंत नृत्यगोपाल दास यांच्याजवळ गेले होते.