भुसावळ येथील भाजीपाला लिलाव अनिश्चित काळासाठी बंद

भुसावळ, प्रतिनिधी । येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील भाजीपाला लिलावात बेशिस्त गर्दीने सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडविल्याने भाजीपाला लिलाव पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर लाईटची व्यवस्था नव्हती. प्रशासनाने तत्काळ या मैदानावर लाईट व्यवस्था केली होती. भाजीपाला लिलावात अधिक प्रमाणात गर्दी होत आहे व ही गर्दी होणे धोकादायक असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर या संदर्भात शुक्रवारी भुसावळात झालेल्या बैठकीत शहरातील भाजीपाला लिलाव पुढील सूचनेपर्यंत रद्द करावा, असे ठरवण्यात आले. यामुळे आता शनिवारपासून भाजीपाल्याचे लिलाव बंद केले आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी गुरुवारी महसूल, पोलिस, नगरपरिषद आणि भुसावळ फळ भाजीपाला असोसिएशनची गुरुवारी तातडीची बैठक झाली. या बैठकीत पालिकेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पालिकेच्या माध्यमातून बॅरिकेट्स तसेच दिवे बसविण्याचे नियोजन करण्यात यावे, असे ठरविण्यात आले होते. मात्र शुक्रवारी या संदर्भात पुन्हा प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, डीवायएसपी गजानन राठोड, मुख्याधिकारी करुणा डहाळे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आदींची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समिती बंद बाबत दिलेल्या आदेशानुसार भाजीपाला लिलावही बंद करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता शेतकरी आपला माल लिलावात घेऊन न जाता थेट ग्राहकांना भाजीपाला विकू शकतील.

Protected Content