कराची (वृत्तसंस्था) पाकिस्तानात पीआयए एअरबस ए ३२० प्रकारातील विमानाला भीषण अपघात झाला आहे. लाहोरहून कराचीला येणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान लँडिंग करताना रहिवाशी भागात कोसळले. लँडिंगला फक्त एक मिनिट उरले असताना कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही दुर्घटना घडली.
विमान कराची विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या जिन्ना गार्डन परिसरातील मॉडल कॉलोनीमध्ये क्रॅश झाले. या परिसराला मलीर म्हटले जाते. विमान घरांवर कोसळल्याने अनेक घरांमध्ये आग लागली. या विमान अपघाताचे काही फोटो समोर आले आहे. त्यानुसार काही घरांमधून धूर निघत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. या घरांमध्ये अनेकजण अडकले आहेत. सध्या अपघातस्थळी बचावकार्य सुरू झालं असून रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. या अपघातात विमानामधल्या प्रवाशांसोबतच मॉडेल टाऊन परिसरातल्या काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून या घटनेची लवकरात लवकर चौकशी होईल, असे म्हटले आहे.