ब्रिटीशकालीन पी. जे. रेल्वे सुरु होण्याची प्रतिक्षा

 

पाचोरा, प्रतिनिधी । कोरोनामुळे बंद केलेली ऐतिहासिक पाचोरा ते जामनेर  ( पी जे ) पुन्हा सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून होते आहे

  पाचोरा ते जामनेर नॅरोगेज मार्गावर धावणाऱ्या ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पी. जे. अर्थात पाचोरा ते जामनेर  या नॅरोगेज रेल्वेची चाके दोन वर्षांपासून धावणे बंद आहे. सुमारे १०३ वर्षांपासून अविरत सुरू असलेली सर्व सामान्यांना परवडणारी पाचोरा – जामनेर (पी. जे.) नॅरोगेज रेल्वे दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या दृष्टीकोनातून बंद करण्यात आली  रेल्वे प्रशासन ही १०३ वर्षांपूर्वी सुरू झालेली ब्रिटिशकालीन रेल्वे कायमची बंद करण्याच्या पावित्र्यात आहे, अशी शंका व्यक्त केली जाते आहे . पाचोरा व जामनेर तालुक्यातील प्रवाशांना परवडणारी पी. जे. ही आता कधीच रुळावर धावणार नाही का ? अशी चर्चा परिसरात सुरू असुन ही रेल्वे कायम सुरुच ठेवावी ही मागणी प्रवाशांकडून होत आहे.

पाचोरा ते जामनेर रेल्वे सन – १९१९ पासुन ब्रिटीशांनी सुरू केली होती. या रेल्वेचा करार १०० वर्षांचा होता. दोन वर्षांपुर्वी दिवसाला चार फेऱ्या करत होती. या रेल्वेतुन अनेक गरिब, शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच सामान्य नागरिक प्रवास करत होते. पाचोरा ते जामनेर हे अंतर ५६ कि. मी. आहे

 

पाचोऱ्याहुन निघाल्यानंतर वरखेडी, पिंपळगाव (हरेश्र्वर), शेंदुर्णी, पहुर, भगदारा, व जामनेर या स्थानकावरुन नियमित चार फेऱ्या मारत होती. परंतु या रेल्वेला अडसर ठरला तो कोरोना आणि तब्बल दोन वर्षांपासून पी. जे. रेल्वे रुळावरुन धावली नाही. ही पी. जे. रेल्वे प्रशासनाने बंद न करता लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.

 

पाचोरा रेल्वे स्थानकावरुन पाचोरा ते जामनेर (पी. जे.) ही प्रवाशी रेल्वे १०० वर्षांपासून अविरत सेवा देत आहे. दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जग त्रस्त आहे. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बऱ्याच प्रवाशी रेल्वे गाड्या बंद केल्या त्यातील पाचोरा – जामनेर (पी. जे.) ही नॅरोगेज रेल्वे आहे. पाचोरा ते जामनेरपर्यंत १६ रुपये टिकीट दर आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनास या प्रवासी रेल्वेतुन मिळणारे उत्पन्न फार कमी आहे. म्हणुनच सद्यस्थितीत ही प्रवाशी रेल्वे गाडी सुरु करण्याबाबतची शक्यता फारच कमी आहे, अशी भीती व्यक्त होत आहे . मात्र ही रेल्वे कायमची बंद करण्याचे अद्याप कुठलेही आदेश वरिष्ठांकडुन आलेले नसल्याचेही पाचोरा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक एस. टी. जाधव यांनी सांगितले.

 

पाचोरा – जामनेर या दोन तालुक्यांच्या प्रवाशांसाठी स्वस्तात मस्त असणारी पी. जे. रेल्वे ही दळणवळणासाठी महत्वाची भुमिका बजावत होती. ही पी. जे. रेल्वे सेवा पुर्वरत सुरू ठेवण्यासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी वरिष्ठ पातळीवर रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावावा. अशी अपेक्षा जळगांव लोकसभा मतदारसंघातील प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

 

Protected Content