वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक उमेदवारांमध्ये वादविवादात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत हा विषारी हवा सोडणारा देश असल्याचे म्हटले. पर्यावरण बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्यावर आपल्या धोरणांचा बचाव करण्यासाठी ट्रम्प यांनी भारत, चीन आणि रशियावर निशाणा साधला.
पॅरिस करारातून अमेरिकेने माघार घेतली आहे. त्यावेळीही ट्रम्प यांच्या धोरणावर टीका झाली होती. अमेरिका हा सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करतो. चीन, भारत आणि रशिया हवेच्या स्तराचा विचार करत नाही. या तीन देशांतील हवेचा स्तर अतिशय वाईट आहे. हे देश प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पॅरिस करारातून बाहेर पडण्याचे त्यांनी समर्थन केले. पॅरिस करार एकतर्फी होता. अमेरिकेचे नुकसान झाले असते त्यांनी म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वीदेखील हवा प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्यावर विरोधकांसोबतच भारत, रशिया आणि चीनवर टीका केली होती. प्रदूषणाच्या नावावर वॉशिंग्टनमधील कट्टर डावे, माथेफिरू डेमोक्रेट्स सदस्यांमुळे असंख्य अमेरिकन कारखाने, उद्योग, चीन व इतर प्रदूषण पसरवणाऱ्या देशांमध्ये गेले आहेत. यामुळे अमेरिकन नागरिकांना रोजगारदेखील गमवावा लागला आहे. हवेची गुणवत्ता चांगली असली पाहिजे यात वाद नाही. मात्र, चीन, रशिया, भारत वायू प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.
दिल्लीतील हवेची गुणवत्ता सातत्याने घसरत असतानाच ट्रम्प यांचे हे विधान आले आहे. अलिपूर, शादीपूर, जहांगीरपुरी, विवेक विहार, वजीरपूर, बवाना आणि मुंडका या भागात प्रदूषणाचा स्तर गंभीर आहे.