५ महिन्यात २२ हजार ९०३ कोटीच्या आरोग्य विमा पॉलिसींची विक्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था, । कोरोना पार्श्वभूमीवर भारतीयांमध्ये आरोग्य विम्याबाबत जागरूकता वाढली जनरल इन्शुरन्स कौन्सिल आणि इन्शुरन्स कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत २२,९०३ कोटी रुपयांच्या आरोग्य विमा पॉलिसींची विक्री करण्यात आली

 

. गेल्या सात वर्षांमध्ये २०,२५० कोटी रुपयांच्या आरोग्य विमा पॉलिसींची विक्री झाली. देशात कोरोना आल्यानंतर उपचारांसाठी ३३०० कोटी रुपयांचे २.०७ लाख दावे विमा कंपन्यांकडे दाखल झाले आहेत. आतापर्यंत इन्शुरन्स कंपन्यांनी १.३० लाख दाव्यांच्या बदल्यात १२६० कोटी रुपये मंजूर केले आहेत. आतापर्यंत आरोग्य विमा क्षेत्रात २३ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. सध्या देशभरात ३२ जनरल आणि हेल्थ इन्शुरन्स कंपन्या आरोग्य विम्याची विक्री करतात.

देशातील ३५ टक्के व्यक्तींजवळ कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आरोग्य विमा आहे. आतापर्यंत आरोग्य विम्यावर खर्च करण्याला प्राथमिकता दिली जात नव्हती कोरोनाच्या संक्रमणानंतर आरोग्य विम्याची विक्री वाढल्याचेही दिसून आले आहे.

ऑगस्टपर्यंत देशभरातून २.०७ लाख ग्राहकांनी उपचारांसाठी दावे केले आहेत. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी केवळ ५.६१ टक्के रुग्णांनीच दावे दाखल केले आहे. दाव्यांची सरासरी रक्कम १.५९ लाख रुपये आहे.

तरुण ग्राहक सुरुवातीला आरोग्य विम्याकडे दुर्लक्षच करायचे. मात्र, कोरोनानंतर परिस्थिती बदलली असून ३५ वर्षांपर्यंतच्या तरुणांचा आरोग्य विम्याकडे वाढता ओढा असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापूर्वी ४२ टक्के जण इन्शुरन्स घेण्यासाठी इच्छुक होते. हा आकडा आता वाढून ६० टक्क्यांवर गेला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, कर्नाटक आणि तमिळनाडू आदी राज्यांमधील महिलावर्गही आरोग्य विम्याविषयी जागरूक झाला आहे. तत्पूर्वी ५७ टक्के महिला वैयक्तिक आरोग्य विमा घेत होत्या. आता हेच प्रमाण वाढून ६९ टक्क्यांवर गेले आहे.

लॉकडाउन काळात नव्या पॉलिसीची खरेदी आणि पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मची मदत मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली. अनलॉकनंतरही ऑनलाइनवरच वाढता भर असल्याचे दिसून आले. आरोग्य विम्यामध्ये गुंतवणूक करणे हिताचे असल्याची भावना ग्राहकांमध्ये वाढीला लागली आहे.

Protected Content