भारत जोडो यात्रेचां बुलडाणा जिल्ह्यातील मुक्काम दोन दिवसांनी वाढला

बुलडाणा –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | खासदार राहुल गांधी याच्या भारत जोडो यात्रेला सगळीकडे दमदार प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान भारत जोडो यात्रेचा बुलडाणा जिल्ह्यातील मुक्काम एकाएकी दोन दिवसांनी वाढला आहे.

 

 

भारत जोडो यात्रा आज, २० नोव्हेंबरला जळगाव जामोद वरून मध्यप्रदेशात मुक्कामी जाणार होती.  मात्र आज यात्रेचा मुक्काम बुलडाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या निमखेडी या गावातच असणार आहे. उद्या सकाळी राहुल गांधी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गुजरातला रवाना होणार आहेत. त्यासाठी तात्पुरत्या हेलिपॅडची उभारणी सुद्धा निमखेडी येथे करण्यात आली आहे. परवा २२ नोव्हेंबरला राहुल गांधी परतल्यानंतर यात्रा नियोजित मार्गाने मार्गस्थ होणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार १८ नोव्हेंबरला शेगाव, १९ नोव्हेंबरला भेंडवळ येथे मुक्काम करून आज, २० नोव्हेंबरला यात्रा निमखेडी मार्गे मध्यप्रदेशात जाणार होती. मात्र राहुल गांधींनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जाण्याचा निर्णय घेतल्याने यात्रेचा जिल्ह्यातील मुक्काम दोन दिवसांनी वाढला आहे. आजचे नियोजित कार्यक्रम आटोपून यात्रा निमखेडी येथे मुक्कामी राहणार आहे. त्यासाठी तयारी सुद्धा झपाट्याने पूर्ण करण्यात येत आहे. उद्या २१, नोव्हेंबरला राहुल गांधी हेलिकॉप्टर ने गुजरातकडे रवाना होतील. तिथल्या सभा आटोपून परवा २२ नोव्हेंबरला ते पुन्हा निमखेडी येथील परत येतील. त्यानंतर यात्रा नियोजित मार्गाने मार्गस्थ होईल. दरम्यान राहुल गांधी यांच्यासोबत असलेले इतर वरिष्ठ काँग्रेस नेते, भारत जोडो यात्री उद्या निमखेडी येथेच थांबणार आहेत.

 

Protected Content