भारतीय लष्कराच्या तडाखेबंद प्रत्युत्तराने पाकिस्तानचा तिळपापड

नवी दिल्लीः वृत्तसंस्था ।   पाकिस्तानकडून दहशतवादी घुसखोरीच्या उद्देशाने एलओसीवरील शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार झाला . भारतीय लष्कराच्या कारवाईत पाक सैन्याचे ११ जवान ठार झाले आहेत. भारतीय लष्कराने दिलेल्या तडाखेबंद प्रत्युत्तराने पाकिस्तानचा पुरता तिळपापड झाला आहे.

पाकिस्तानने भारतीय राजदुतांना समन्स पाठवले आहेत. पाकिस्तानचे डीजी आणि परराष्ट्रमंत्री एमएम कुरेशी पत्रकार परिषद घेणार आहेत. एलओसीवरील धुमश्चक्रीसंदर्भात ही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर पाकिस्तानी सैन्याने एलओसीवरून अतिरेक्यांच्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवरील भारतीय लष्कराच्या अनेक चौक्यांना लक्ष्य केलं. पाकच्या गोळीबारात भारताचे पाच जवान शहीद झाले. तर ६ नागरिकही ठार झाले. भारतीय लष्कराचे चार जवान आणि बीएसएफचा एक जवान यात शहीद झाला. काही सैनिकही जखमी झाले आहेत.

केरन, पुंछ आणि उरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्यला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानचे बंकर आणि लाँच पॅड उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानचे जबर नुकसान झाले आहे.

पाकिस्तानकडून या आठवड्यात घुसखोरी करण्याचा हा दुसरा प्रयत्न आहे. यापूर्वी ७-८ नोव्हेंबरला पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. त्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना भारतीय लष्कराच्या जवानांनी ठार केलं होतं.

Protected Content