भादली बुद्रुक गावामध्ये रंगली एच.आय.व्ही. एड्सवर चित्रकला स्पर्धा

 

जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील भादली बुद्रुक गावातील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयामध्ये १४ वर्षावरील वयोगटातील मुलांमध्ये एचआयव्ही एड्सबद्दल जनजागृती करण्यात आली. नेहरू युवा केंद्र जळगाव आणि जिंदगी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन भादली गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अंजली पाटील यांनी केले. जिंदगी फाऊंडेशनचे सचिव अजय पाटील यांनी एचआईव्ही बद्दल उपस्थित मुलांना माहिती सांगितली. शरीर स्वच्छता कशी ठेवावी, तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्वही समजावून सांगितले. यावेळेस या विषयावरील एक चित्रकला स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून जळगाव आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारीे अनिरुद्ध कांबळे यांनी काम पाहिले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अजय सोनवणे याने, द्वितीय क्रमांक लीताली अत्तरदे तर तृतीय क्रमांक तनुजा चौधरी हिने पटकावला. या कार्यक्रमाला जिंदगी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुष्मिता भालेराव, सदस्य विशाल बोदडे, शाळेचे मुख्याध्यापक आर. के. तायडे, शाळेचे चित्रकला शिक्षक आर. पी. अत्तरदे तसेच लिंकवर्कर उषा कोळी आणि कल्पना वाणी उपस्थित होत्या.

Protected Content