भाजप-राष्ट्रवादीत गुप्त चर्चा

 

 

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । मनसुख हिरेन मृत्यू , अँटिलिया स्फोटक आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीत अहमदाबादमध्ये गुप्त चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे.

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र भेटीचं वृत्त अफवा असल्याचं सांगितलं आहे.

 

भाजपच्या निकटवर्तीय बड्या उद्योगपतीची प्रफुल पटेल यांनी भेट घेतल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं. अहमदाबादमधील फार्महाऊसवर 26 मार्चच्या रात्री 9.30 वाजता ही भेट झाल्याची माहिती होती.  पटेलांची संबंधित उद्योजकाशी भेट झाली, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही अहमदाबादेतच होते, असं बोललं जात होतं. मात्र या बैठकीला पवार उपस्थित होते का, याची पुष्टी मिळालेली नव्हती.

 

शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्ट हाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत  आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

अँटिलिया प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते असलेले ‘गृहमंत्री’ अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ही अफवा असल्याचं सांगत भेटीचं वृत्त नाकारलं आहे. शरद पवार यांनी भाजप नेत्यांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपने वर्तमानपत्रातून अशा बातम्या पेरल्या आहेत, असा दावा मलिक यांनी केला.

 

परमबीर सिंग यांच्या आरोपपत्रामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून जावे लागेल आणि सरकार डळमळीत होईल असे वातावरण निर्माण झाले होते. यापैकी काहीच घडले नाही. तरीही देशभरात चर्चा झाली व महाराष्ट्राची बदनामी झाली, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरात लिहिलं आहे.

Protected Content