भाजप नेते वसीम बारी यांची अतिरेक्यांकडून हत्या !

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा येथे अतिरेक्यांनी भाजप नेते वसीम बारी यांची हत्या केली आहे. अतिरेक्यांनी बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुकानाजवळ जाऊन बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात वसीम यांचे वडील बशीर अहमद आणि भाऊ उमर सुल्तान यांचादेखील मृत्यू झाला.

 

वसीम यांच्या सुरक्षेसाठी 8 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. मात्र, अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा घटनास्थळी एकही सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हता. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात आल्याची माहिती, पोलिसांनी दिली आहे. वसीम बारी यांचं बंदीपोरामध्ये दुकान आहे. दुकानाजवळच त्यांचे घरदेखील आहे. बुधवारी रात्री ते वडील आणि भावासोबत दुकानात होते. यावेळी अतिरेक्यांनी दुकानाबाहेर घेराव घातला. दुकानात वसीम यांच्यासोबत एकही सुरक्षा रक्षक नव्हता. याच संधीचा फायदा घेत अतिरेक्यांनी गोळीबार सुरु केला. या हल्ल्यात वसीम, त्यांचे वडील आणि भाऊ यांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वसीम बारी यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. भाजप नेते जितेंद्र सिंह म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदींना फोनवरून वसीम बारी यांच्या हत्येची माहिती मिळाली आहे. त्यांनी वसीमच्या कुटुंबीयांबद्दलही संवेदना व्यक्त केली. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही वसीम बारीवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत दुख व्यक्त केलं आहे. ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले की, ‘आज संध्याकाळी बांदीपोरा येथे भाजप अधिकारी आणि त्यांच्या वडिलांवर प्राणघातक दहशतवादी हल्ल्याबद्दल ऐकून फार वाईट वाटले. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. या कठीण काळात मी त्याच्या कुटुंबासमवेत शोक व्यक्त करतो.’

Protected Content