भाजप कार्यकर्ते उद्या महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार

पाचोरा : प्रतिनिधी । महावितरणाने विज पुरवठा खंडित करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा यासाठी उद्या ( दि. ५ ) सकाळी १० वाजता महावितरण कार्यालयासमोर भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यातील ७२ लाख वीजग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा जुलमी निर्णय ठाकरे सरकारने त्वरित मागे घेण्यासाठी उद्या भारतीय जनता पार्टी पाचोरा शहर व ग्रामीणच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे भाजपाच्यावतीने याआधी देखील लॉकडाऊन काळातील वीज बिलात सवलत मिळावी यासाठी संपूर्ण शहरातील चौकाचौकात फलक लावून स्वाक्षरी मोहीम राबवली गेली होती. शहरातील नागरिकांच्या फलकावर सह्या घेऊन नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडुन अनोख्या पद्धतीने आंदोलन केले गेले होते.

कोरोना काळात जनतेला वीज बिलात सवलत देण्याचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीजबिल वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. मात्र आम्ही ठाकरे सरकारला मनमानी कारभार करू देणार नाहीत. भाजपाचे कार्यकर्ते महावितरणा विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतील वीज पुरवठा खंडित करण्यास येणाऱ्या महावितरणाच्या कर्मचार्‍याला अटकावही करतील., असे आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले

आमचे सरकार असतांना कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीज जोडण्या दिल्या गेल्या आणि वीज कंपन्याही फायद्यात राहिल्या होत्या, आमच्या सरकारला ते शक्य होते तर आताच्या सरकारला का कठीण आहे ? असा सवाल विचारत या आंदोलनात तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते व जनतेने आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व शहराध्यक्ष रमेश वाणी यांनी केले.

Protected Content