कोलकाता : वृत्तसंस्था । विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना पराभूत करणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात चक्रीवादळातील पीडितांना देण्यासाठी आणलेलं साहित्य व ताडपत्री चोरल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.
कोंटाई नगरपालिकेच्या व्यवस्थापन मंडळ सदस्य असलेल्या रत्नदीप मन्ना यांनी लेखी तक्रार दिली त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीत नोंद केल्याप्रमाणे २९ मे रोजी हिमांशू मन्ना आणि प्रताप डे नावाच्या व्यक्तींनी नगरपालिकेच्या गोदामातून ताडपत्रींचा एक ट्रक चोरून नेला आहे. यात सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी याचा हात असल्याचा आरोप आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय सुरक्षा दलाची मदत घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी सुवेंदू अधिकारी, सौमेंदू अधिकारी, हिंमाशू मन्न आणि प्रताप डे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रताप डे याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु केली आहे. मदत साहित्य नंदीग्राममधील यास चक्रीवादळात पीडितांना वाटण्यासाठी घेऊन गेल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
शनिवारी पोलिसांनी सुवेंदू अधिकारी यांच्या आणखी साथीदाराला अटक केली आहे. सरकारी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी रेखल बेरा याला अटक केली आहे. सुजीत डे यांच्या तक्रारीनंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. २०१९ पासून तरुणांची फसवणूक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जलसंधारण खात्यात नोकरी लावतो असं सांगून बेरा आणि चंचल नंदी यांनी २ लाख रुपये घेतल्याचंही सुजीत डे यांनी सांगितलं आहे.