प्रेमप्रकरणातून ‘त्या’ तरुणाचा गळा दाबून खून; दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिरसोली- जळगाव रेल्वेलाईनवर मध्यरात्री तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मात्र तरुणाने आत्महत्या केली नसून प्रेमप्रकरणातून गळा दाबून खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील शिरसोली- जळगाव रेल्वेलाईनवर मध्यरात्री विनोद सुनील महाजन वय 18 रा. हरीविठ्ठल नगर या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास समोर आला. विनोदने आत्महत्या केली नसून विवाहितेशी प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरुन त्याचे शरीराचे दोन तुकडे करुन मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिल्याचा आरोप विनोदच्या कुटुंबियांनी केला होता. त्याची दखल घेत रामानंदनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये गुन्ह्याचा उलगडा केला आहे. प्रेमसंबंधातूनच विनोदचा खून करणार्‍या विवाहितेचा पती कैलास राजेश महाजन व भाऊ विलास राजेश महाजन या दोघा सख्या भावंडांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मित्राचा वापर करुन बहाण्याने विनोदला आपल्याच घरी बोलावून त्याला गळा दाबून मारले. यानंतर पोत्यात मृतदेह टाकून रात्री रिक्षातून रेल्वेलाईनकडे घेवून जावून तो रेल्वे रुळावर टाकून दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

असा आला होता प्रकार समोर
रेल्वे स्टेशन प्रबंधक आर.के.पालरेचा यांनी शुक्रवारी रात्री 1.55 वाजेपूर्वी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फोन करुन शिरसोली जळगाव रेल्वे लाईनवर खंबा क्रमांक 415/13, 415/15 येथे तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती दिली. त्यानुसार कर्मचारी अनिल फेगडे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळ गाठले. व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तरुणाजवळ आढळून आलेल्या मोबाईलमधील क्रमाकांवर संपर्क साधला असता, तो त्याच्या अकोला येथील मावसआजीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालय गाठले असता, ओळख पटविली असता, तरुण हा हरिविठ्ठल नगरातील विनोद महाजन असल्याचे समोर आले. याप्रकरणी स्टेशन प्रबंधक आर.के.पालरेचा यांच्या खबरीवरुन रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित कैलास व विलास हे दोन्ही भाऊ एमआयडीसीतील कंपनीत कामाला आहे. त्याचा आणखी लहान भाऊ आहे. कुटुंबासह सर्व जण हरिविठ्ठल नगरातच राहतात. याच ठिकाणी वास्तव्यास असलेला विनोद महाजन याचा संशयित कैलास व विलास यांचा लहान भाऊ मित्र बनला. त्यामुळे विनोदचे त्याच्या घरी येणे जाणे सुरु झाले. यातून विनोद व मित्राची वाहिनी यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रेमसंबंध सुरु असल्याची माहिती आहे. विनोदचे येणे जाणे वाढल्याने कैलासला संशय आला. कैलासवर विनोदच्या खूनाचे भूत सवार झाले. मित्राचाच वापर करुन कैलासने भाऊ विलाससोबत खूनाचे नियोजन केले. ठरल्यानुसार विनोदला त्याचा मित्र बहाण्याने शुक्रवारी सायंकाळी तांबापुरा येथे घेवून गेला. याठिकाणी आधीच कैलास व विलास उभे होते. दोघांनी विनोदला ताब्यात घेत, आपल्या घरी नेले. घरी नेल्यावर कैलास व विलास दोघांनी विनोदची समजूत काढली. यानंतर खूनाचे भूत सवार झालेल्या कैलासने रुमालाले विनोदळा गळा आवळला. विनोद मेल्याची खात्री केल्यावर यानंतर दोघांनी मृतदेह पोतडीत भरला. रात्री 11 वाजेच्या सुमारास रेल्वेलाईन गाठून रुळावर मृतदेह टाकून दिला. याठिकाणी धावत्या रेल्वेखाली येवून त्याच्या शरीराचे तुकडे झाल्याचे समोर आले आहे.

कुटुंबियांनी आरोप केल्यानुसार पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांची दखल घेतली. व तपासाच्या सुचना केल्या. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील शरद पाटील, संतोष गीते, सहाय्यक पोलीस निरिक्षक राठोड यांनी गुन्ह्याचा उलगडा गेला. यानंतर रविवारी दोघा भावंडांना एमआयडीतील काम करत असलेल्या कंपनीतून ताब्यात घेतले. याप्रकरणी उशीरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरु होती.

Protected Content