अमृतसर : वृत्तसंस्था । शेतकऱ्यांच्या एका गटाने भाजपा आमदारावर हल्ला केला. इतकंच नाही, तर त्यांचे कपडेही फाडले. संतापलेल्या शेतकऱ्यांच्या तावडीतून सुटका करत पोलिसांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहे. मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असून, शेतकऱ्यांच्या संतापाचा आता कडेलोट होत असल्याचं दिसत आहे.
काही महिन्यांपासून पंजाबमधील भाजपा नेते शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करताना दिसत आहे. त्यातच आता पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोटमध्ये शेतकऱ्यांच्या गटाने भाजपा आमदाराला निशाणा बनल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपा आमदार अरुण नारंग यांच्यावर शेतकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली.
अबोरचे आमदार नारंग हे शनिवारी स्थानिक नेत्यांसह मलोतमध्ये पत्रकार परिषदेसाठी आले होते. त्यावेळी त्यांना आंदोलक शेतकऱ्यांनी घेराव घातला. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी शाही फेकली. अचानक झालेल्या शाही हल्ल्यानंतर पोलिसांनी नारंग यांच्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांना एका दुकानात नेलं. मात्र, थोड्या वेळाने आमदार नारंग आणि भाजपा कार्यकर्ते बाहेर आल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आमदार यांचे कपडेही फाडले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आमदार नारंग म्हणाले,”मी मलोतमध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी गेलो होतो, मात्र शेतकऱ्यांनी परवानगी दिली नाही. शेतकरी आक्रमक झाले आणि मला वेढा दिला. मला काही शेतकऱ्यांनी धक्के मारले. त्याचबरोबर माझे कपडेही फाडण्यात आले,” असं नारंग यांनी म्हटलं आहे. आमदार नारंग यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह व शिरोमणी अकाली दलानेही नाराजी व्यक्त करत घटनेचा निषेध केला आहे.