मुंबई : वृत्तसंस्था । राज्य भाजपने मॅरेथॉन बैठकांचे आयोजन केलं आहे. ५ आणि ६ जानेवारीला सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत महामंथन होणार आहे. या बैठकीमध्ये आगामी निवडणुका, सध्याची राजकीय स्थिती, ग्राम पंचायत आणि महापालिकांच्या निवडणुका हे विषय फोकस असण्याची चिन्हं आहेत.
राज्य कोअर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित असताना, विनोद तावडे यांना मात्र या बैठकीला स्थान देण्यात आलेलं नाही. विनोद तावडे हे राज्य कार्यकारिणीमध्येही नाहीत. त्यामुळे ते बैठकीला अनुपस्थित राहू शकतात. मात्र पक्षाचा जुना जाणता नेता असताना, महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर असणं अपेक्षित नाही.
५ तारखेला प्रदेश पदाधिकारी आणि विविध मोर्चाच्या अध्यक्षांची बैठक आहे. संध्याकाळी कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. विनोद तावडे यांना कोर कमिटीत स्थान नाही. ६ तारखेला पाचही महापालिका निवडणुकी संदर्भात इलेक्शन कमिटीची बैठक होणार आहे.
विनोद तावडे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये असले, तरी राज्याच्या दृष्टीने तावडे हे भाजपमधील महत्त्वाचे नेते म्हणून चर्चेत होते. . त्यातच या बैठकीला तावडेंना निमंत्रण नसणं हे लक्ष वेधून घेणारं आहे.