खा. ए.टी. पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची खोटी क्लिप व्हायरल !

‘त्या’ क्लिप प्रकरणी गुन्हा दाखल करणार- ए.टी. पाटील

जळगाव प्रतिनिधी । खासदार ए.टी. नाना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची बनावट क्लिप सोशल मीडियात प्रसारीत केली जात असून या प्रकरणी आपण गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती खासदार ए.टी. पाटील यांनी लाईव्ह ट्रेंडस् न्यूजशी बोलतांना दिली.

याबाबत माहिती अशी की, भाजपमधील गटा-तटांमुळे खासदार ए.टी. पाटील यांचे तिकिट कापण्यात आल्याची बाब उघड आहे. या कारस्थानात उन्मेष पाटील सहभागी असल्याने आपण त्यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका त्यांनी आधीच जाहीर केली होती. यानंतर ते प्रचारदेखील कुठे आढळून आले नाहीत. यातच आता ए.टी. पाटील यांनी भाजपचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे वृत्त आता सोशल मीडियातून व्हायरल केले जात आहे. याच्या पुष्टर्थ्य एक क्लीपदेखील शेअर करण्यात आलेली आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस् न्यूजने ए.टी. पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

याप्रसंगी खासदार ए.टी. पाटील म्हणाले की, ही क्लिप मॉर्फ केलेली असून पूर्णपणे बनावट असून आपण आजही भाजपमध्येच आहे. काही जणांच्या कट-कारस्थानांमुळे आपले तिकिट कापले गेले असले तरी आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत. यामुळे संबंधीत क्लीप शेअर करणार्‍यांच्या विरूध्द आपण गुन्हा दाखल करणार आहोत. विशेष करून उन्मेष पाटील मित्रमंडळाच्या सदस्यांनी सोशल मीडियात ही पोस्ट शेअर केली असून आपण याबाबत पोलीसात तक्रार देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांचा आपण प्रचार करणार का ? या प्रश्‍नाला मात्र नानांनी उत्तर न देता मौन बाळगणे पसंद केले.

Add Comment

Protected Content