भाई ने बोला है बॉलिवूडवाला मसला बंद करो

 

नवी दिल्ली,  वृत्तसंस्था । दिल्लीत एक नवी तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आलीय. ही तक्रार केलीय अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी… पाकिस्तानातून आलेल्या फोन कॉलवर बॉलिवूडविरुद्ध वक्तव्यं न करण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार सिरसा यांनी दाखल केली आहे. मला आज +९२३०५६९८५६०५ या क्रमांकावरून कॉल आला. फोन करणाऱ्यानं म्हटलं, ‘भाई ने बोला है बॉलिवूडवाला मसला बंद करो’. त्यावेळी मी विचारलं की ‘भाई कोण?’… उत्तर मिळालं, ‘तुला भाई नाही माहीत, सगळ्या देशाला हे माहीत आहे. पंगा घेणं बंद करा नाहीतर सगळ्यांना निपटवून टाकू’ असे धमकावल्याचे त्यांनी म्हटले आहे .

जेव्हा मी पुन्हा एकदा विचारलं की भाई कोण आहे? तेव्हा उत्तर मिळालं की चुपचाप ही बॉलिवूडची नौटंकी बंद करा. गुन्हे परत घ्या, नाहीतर ठोकून टाकू. जेव्हा तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना गोळी लागेल तेव्हा कळेल भाई कोण आहे ते’, असंही मनजिंदर सिंह सिरसा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. सिरसा यांनी दिल्ली पोलिसांना चौकशी करण्याची विनंती केलीय.

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू गुन्ह्याच्या चौकशीत ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानं या प्रकरणाला एक वेगळंच आणि अनपेक्षित वळण मिळालं. बॉलिवूडमधील अनेक प्रतिष्ठीत मंडळींची नावं ड्रग्जच्या यादीत समोर येत आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत सिने अभिनेत्री सारा अली खान, दीपिका सिंग पादूकोन, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांचीही चौकशी करण्यात आलीय.

खुद्द मनजिंदर सिंह सिरसा यांनी ही माहिती एका ट्विटद्वारे दिलीय. ट्विटमध्ये त्यांनी पाकिस्तानातून फोन कॉल आल्याचं म्हटलंय. याबाबत आपण पोलिसांत तक्रार दाखल केल्याचाही उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय.

ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडची साखळी समोर आल्यानंतर मनजिंदर सिंह सिरसा गेल्या काही दिवसांपासून अनेकदा करण जोहरसहीत अनेक बॉलिवूड स्टार्सवर निशाणा साधताना दिसले होते. सिरसा यांनी करण जोहरच्या वादग्रस्त पार्टीच्या व्हिडिओवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

उल्लेखनीय म्हणजे, एनसीबीची एक टीम बॉलिवूडमध्ये ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करत आहे. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यासहीत जवळपास अर्धा डझन लोक तुरुंगात आहेत.

Protected Content