आले हो आले नवीन आयफोन आले : जाणून घ्या इत्यंभूत माहिती !

गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या अ‍ॅपल कंपनीच्या इव्हेंटमध्ये आज आयफोन १४ ही मालिका लॉंच करण्यात आली.

अ‍ॅपल कंपनीने आधीच ७ सप्टेंबर रोजी आपला मेगा इव्हेंट जाहीर केल्यापासूनच यात नेमके काय लॉंच होणार ? याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. या विशेष करून आयफोन १४ मालिका, अ‍ॅपल वॉच सेरीज ८, एयरपॉडस प्रो-२ आदी उपकरणांना सादर करण्यात येणार असल्याचे मानले जात होते. याबाबतचे अनेक लीक्स देखील समोर आले होते. यामुळे मोठ्या उत्सुकतेच्या वातावरणात भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास ऍपलचा महासोहळा सुरू झाला. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी प्रारंभीच हे तिन्ही प्रॉडक्ट लॉंच होणार असल्याची माहिती दिली.

यानंतर आयफोनची घोषणा करण्यात आली. यात प्रारंभी आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लस या दोन मॉडेल्सला सादर करण्यात आले. यात अनुक्रमे ६.१ आणि ६.७ इंच आकारमानांचे ओएलईडी या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आले आहेत. अर्थात, यातील मोठ्या डिस्प्लेच्या मदतीने युजर्सला अधिक चांगल्या प्रकारचा अनुभव मिळणार आहे. दोन्ही मॉडेल्सला सिरॅमीक शिल्ड प्रदान केले असून ते वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असल्याने ते कोणत्याही विषम वातावरणात सहजपणे वापरता येणार आहे. यात आयफोन १४ व आयफोन १४ प्लसमध्येही दर्जेदार बॅटरी दिलेली आहे.

आयफोन १४ हे मॉडेल बायोनिक ए १५ या गतीमान प्रोसेसरवर चालणारे आहे. यामुळे उच्च ग्राफीक्सयुक्त चलचित्र अथवा गेम्सचा यावर गतीमान पध्दतीत आनंद घेता येईल. आयफोन १४ या मॉडेलमध्ये दर्जेदार कॅमेरा प्रदान करण्यात आलेला आहे. यातील मुख्य कॅमेरा १२ मेगापिक्सलचा असून याला १२ मेगापिक्सल्सच्या दुसर्‍या कॅमेर्‍याची जोड दिलेली आहे. यात ४९ टक्के प्रकाश कमी असला तरी चांगल्या दर्जाचे फोटो आणि व्हिडीओ घेता येणार आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये १२ मेगापिक्सल्सचाच कॅमेरा प्रदान करण्यात आलेला आहे. फोटॉनिक इंजिनच्या मदतीने यातून काढलेल्या चित्रांना खर्‍या अर्थाने जीवंतपणा मिळणार आहे. तर, यात व्हिडीओ काढतांना ऍक्शन मोड दिलेला आहे. यातून हलणार्‍या चलचित्रांना स्थैर्य प्राप्त होणार आहे.

आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लस या दोन्ही मॉडेल्समध्ये फाईव्ह-जी कनेक्टीव्हिटी दिलेली आहे. यात मल्टीपल ई-सीमची सुविधा असल्याने कुणीही आपली कॅरियर सर्व्हीस सहजपणे बदलू शकणार आहे. अर्थात, यातून कुणीही आपला फोन नंबर देखील सहजपणे बदलू शकणार आहे. सुरक्षेसाठी यात क्रॅश डिटेक्शन हे फिचर दिलेले आहे. यामुळे युजर संकटात सापडल्याचे आढळून येताच इमर्जन्सी सेवांना आपोआप अलर्ट जाणार आहे.

या दोन्ही मॉडेल्समधील लक्षवेधी फिचर म्हणजे यात आपत्कालीन मॅसेज उपग्रहांच्या मदतीने पाठविण्याची सुविधा दिलेली आहे. अर्थात, नेटवर्क असतांनाही आपत्कालीन सेवा मिळवता येणार आहे. यासाठी युजरला खुल्या जागेत जाऊन इनबिल्ट फिचरच्या मदतीने सॅटेलाईटला कनेक्ट व्हावे लागणार आहे. अगदी सुलभ पध्दतीत ही कनेक्टीव्हिटी होणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. हे दोन्ही मॉडेल पहिल्यांदा अमेरिका आणि कॅनडात लॉंच झाल्यानंतर ते भारतासह अन्य देशांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. आयफोन १४चे मूल्य ७९९ तर आयफोन १४ प्लसचे मूल्य ८९९ अमेरिकन डॉलर्स असणार आहेत.

यानंतर आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्रो मॅक्स हे मॉडेल्स लॉंच करण्यात आले. यात या दोन्ही मॉडेल्सपेक्षा अद्ययावत फिचर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. यात देखील मजबूत बांधणी प्रदान करण्यात आलेली आहे. यात डायनॅमिक आयलँड या प्रकारातील नॉच दिलेली असून ती युजरला कॅमेरा वापरात नसतांना नोटिफिकेशन्ससह अन्य फंक्शन्स वापरण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये ए १६ बायोनिक प्रोसेसर दिलेले असून ते अतिशय गतीमान असे आहेत.

या दोन्ही मॉडेल्समध्ये जंबो कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. यात अद्ययावत कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. यातील प्रमुख कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा असून याला प्रत्येकी १२ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. यातून अतिशय दर्जेदार छायाचित्रे आणि व्हिडीओ घेणार आहे. यातून जीवंत वाटणार्‍या प्रतिमा आणि व्हिडीओ घेता येतील. यात देखील फोटोनिक इंजिन प्रदान करण्यात आलेले आहे. यातून फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. यात गिंबल प्रमाणे स्टॅबिलायझेशन मिळणार असून सिनेमॅटीक मोडमधून चित्रपटासारखे चित्रीकरण करता येणार आहे. यात देखील उपग्रहाच्या मदतीने आपत्कालीन संदेश पाठविता येणार आहेत.

आयफोन १४ प्रो याचे मूल्य ९९९ तर आयफोन १४ प्रो मॅक्सचे मूल्य १०९९ डॉलर्स आहेत. हे दोन्ही मॉडेल्स देखील पहिल्यांदा अमेरिका व कॅनडात सादर करण्यात येणार असून लवकरच ते भारतात मिळणार आहेत.

भारतातील मूल्य

दरम्यान, कार्यक्रम संपल्यानंतर ऍपलने लागलीच भारतीय बाजारपेठेसाठी आयफोनच्या किंमती देखील जाहीर केल्या आहेत. यानुसार, आयफोन १४ आणि १४ प्लस मॉडेल्स हे तीन स्टोअरेज व्हेरियंटमध्ये सादर करण्यात येणार असून त्यांचे मूल्य खालील प्रमाणे आहे.

आयफोन १४ : रूपये ७९,९९० ( १२८ जीबी स्टोअरेज) ; ८९,९९० (२५६ जीबी स्टोअरेज) आणि १,०९,९९० ( ५१२ जीबी स्टोअरेज)

आयफोन १४ प्लस : रूपये ८९,९९० ( १२८ जीबी स्टोअरेज) ; ८९,९९० (२५६ जीबी स्टोअरेज) आणि १,१९,९९० ( ५१२ जीबी स्टोअरेज)

आयफोन १४ प्रो या मालिकेत चार व्हेरियंट असून त्यांचे मूल्य खालीलप्रमाणे असणार आहे.

आयफोन १४ प्रो : रूपये १,२९,९९० ( १२८ जीबी स्टोअरेज) ; १,३९,९९० (२५६ जीबी स्टोअरेज) आणि १,५९,९९० ( ५१२ जीबी स्टोअरेज) आणि १,७९,९९० ( एक टिबी स्टोअरेज)

आयफोन १४ प्रो मॅक्स : रूपये १,३९,९९० ( १२८ जीबी स्टोअरेज) ; १,४९,९९० (२५६ जीबी स्टोअरेज) आणि १,६९,९९० ( ५१२ जीबी स्टोअरेज) आणि १,८९,९९० ( एक टिबी स्टोअरेज)

Protected Content