कर्तृत्वाला नियतीची साथ : गिरीशभाऊ महाजनांची यशस्वी वाटचाल !

राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा मंत्री तथा भाजपचे दिग्गज नेते ना. गिरीशभाऊ महाजन यांचा वाढदिवस ! यानिमित्त त्यांचे प्रदीर्घ काळापासूनचे स्नेही असलेले अभियंता एम.एम. पाटील यांनी खास लाईव्ह ट्रेंडस न्यूजसाठी नाविन्यपूर्ण आयामातून त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा !

अनेक दिग्गज, योग्यता असलेले, समर्थ राजकीय वारसा असलेले, कर्तृत्ववान नेते.. नशिबाची म्हणा किंवा नियतीची म्हणा, साथ न मिळाल्याने निवडून येऊ शकले नाहीत. आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे आपल्याला आढळून येतील. मात्र राजकीय क्षेत्रात प्रवेशासाठी सामान्य परिवारातील, अल्पसंख्याक समाजातील गिरीशभाऊ महाजन यांच्या धडपडीला, प्रयत्नांना नियती देखील कशी साथ देत होती बघणे रंजक ठरेल.

जामनेर हा मराठा बहुल मतदारसंघ. याशिवाय बंजारा, गुजर, मुस्लिम, धनगर, कोळी, माळी, राजपूत, तडवी, वंजारी, तेली, बौद्ध यांची संख्या लक्षणीय. जैन, माहेश्वरी, अग्रवाल ही अल्पसंख्याक पण व्यापारी, तालुक्यातील अर्थकारणावर, पर्यायाने राजकारणावर प्रभाव असलेले समाज देखील तितकेच महत्वाचे आहेत.

गिरीशभाऊ महाजन यांच्या कारकिर्दीबाबत भाष्य करण्याआधी जामनेरचा राजकीय इतिहास आपल्याला तपासून पहावा लागेल. १९५२ च्या पहिल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीपासून १९९० पर्यंत जामनेर विधानसभा मतदारसंघावर कॉंग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. १९५२, १९६२, १९६७, १९८०, १९८५ आणि १९९० अश्या ६ निवडणुकीत कॉंग्रेस तर १९५७ ला प्रजासमाजवादी, १९७२, १९७८ ला अपक्ष अशा तीन निवडणउकांमध्ये कॉंगेसेतर उमेदवार निवडून आले होते. १९७२ च्या इंदिरा गांधी व कॉंग्रेसच्या अभूतपूर्व लाटेत जिल्ह्यातील १२ पैकी जामनेरची (एकमेव) जागा वगळता ११ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. तर, जामनेरला अपक्ष उमेदवार नारायण किसन पाटील यांनी कॉंग्रेस उमेदवाराच्या विरोधात निसटता विजय मिळाला होता.

जामनेरच्या राजकीय इतिहासात १९७८ हे वर्ष महत्वाचे मानले जाते. याच वर्षी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या गिरीशभाऊंच्या नेतृत्वगुणांना पैलू पडण्यास प्रारंभ झाला. तर याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव गरुड हे (अपक्ष) मराठा समाजाचे आमदार दुसर्‍यांदा निवडून आले होते. राज्याच्या इतिहासात विधानसभा उपाध्यक्ष पदावर (७८-७९) आसनस्थ झालेले गजाननराव गरुड हे एकमेव अपक्ष आमदार आहेत. तर, जामनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शेवटचे मराठा समाजाचे आमदार देखील तेच ठरले. बहुआयामी गजाननराव गरुड यांना अरबी सह सुमारे ५-६ भाषा अवगत होत्या ही बाब येथे मुद्दाम नमूद करावीशी वाटते. विधानसभा मुदतपूर्व बरखास्त झाल्याने गरुड यांची कारकीर्द अडीच वर्षात संपुष्टात आली. यानंतर ते आमदार देखील झाले नाहीत.

यानंतर १९८० साली ईश्‍वरबाबूजी जैन यांनी विधानसभेत विजय प्राप्त केला. कॉंग्रेस (यू) कडून लढतांना त्यांनी कॉंग्रेस आयचे उमेदवार बाबूसिंग राठोड यांचा पराभव केला. तर गजाननराव गरूड हे तिसर्‍या स्थानावर फेकले गेले. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराला प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा ज्या विधानसभा क्षेत्रातून कमी मतं मिळतील त्या विद्यमान आमदाराला उमेदवारी मिळणार नाही असा निकष लावण्यात आला होता. या निकषांवर अनेक विद्यमान आमदारांप्रमाणे ईश्वरलाल जैन यांचे देखील तिकीट कापले गेले. या निवडणुकीत मूळचे चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी (बंजारा समाजाचे) श्री बाबूसिंग राठोड यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली आणि अपक्ष उमेदवार नारायण सोनजी पाटील (माजी पंचायत समिती सभापती) यांचा पराभव करून ते निवडून आले. (बाबूसिंग राठोड यांना निवडून आणण्यात ईश्वरलाल जैन यांची भूमिका महत्त्वाची होती. तर या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ सुरेश मन्साराम पाटील यांना तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. १९८५ सालच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात भाजपने विधानसभेच्या दोनच जागा लढवल्या. एक रावेर आणि दुसरी जामनेर. यात रावेर मधून डॉ गुणवंतराव सरोदे यांच्या रूपाने जिल्ह्यात भाजपने पहिला विजय नोंदवला. तर जामनेरात मात्र पक्षाला अपयश आले.

भाजप आणि (त्यावेळी शिवसेना भाजप युतीतील मोठाभाऊ असलेल्या) शिवसेना एकत्र येऊन लढले. जिल्ह्यातील १२ पैकी ७ जागा शिवसेना तर ५ जागा भाजपच्या वाट्याला आल्या. जामनेरमध्ये भाजप फारसा प्रबळ नसल्याने जामनेर विधानसभेची जागा शिवसेनेला सुटली. जामनेर मधून ईश्वरलाल जैन यांची कॉंग्रेसची उमेदवारी निश्चित होती आणि तशी निवडणूक लढण्याची तयारी जैन यांनी आधीच सुरू केली होती पण ऐन वेळी त्यांना जळगावातून सुरेशदादा जैन यांच्या विरोधात निवडणूक लढायचे पक्ष नेतृत्वाने आदेश दिले आणि जामनेर मधून निवडून येण्याची शक्यता असतांना व जळगावमधून निवडून येण्याची शक्यता नसतांनाही ईश्वरलाल जैन यांना जळगावातून लढावे लागले; आणि अपेक्षेप्रमाणे तिथे सुरेशदादा जैन विजयी झाल. मात्र जामनेरची उमेदवारी ईश्वरलाल जैन यांच्या पसंतीचे उमेदवार गुजर समाजाचे दत्तात्रय महाजन तत्कालीन जामनेर ग्रामपंचायत सरपंच यांना देण्यात आली. शिवसेनेचे डॉ मनोहर गजमल पाटील आणि दत्तात्रय महाजन यांच्यात सरळ होणारी लढत शेजारच्या एदलाबाद तालुक्यातील आणि शिखर बँकेचे चेअरमन प्रल्हादराव पाटील यांच्या एस कॉंग्रेसच्या उमेदवारीने तिरंगी आणि अटीतटीची झाली. या निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार दत्तात्रय महाजन निवडून आले.

दत्तात्रय महाजन जामनेरचे सरपंच होते, अभ्यासू होते पण त्यांना कधी आमदार होण्याची अपेक्षा आणि महत्वाकांक्षा नव्हती, त्यांनी तिकीटदेखील मागितले नव्हते आणि पुढील निवडणुकीत त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता देखील नव्हती. पुढील निवडणूकित कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार ईश्वरलाल जैन हेच असणार हे निश्चितच होते त्यामुळे दत्तात्रय महाजन हे आमदारकीच्या कालावधीत राजकीय दृष्ट्या फार सक्रीय नव्हते.

दरम्यान, ८५ ते ९० या काळात गिरिशभाऊ महाजन हे आपल्या कार्याच्या, चळवळीच्या माध्यमातून भाजपच्या राज्य आणि केंद्र स्तरावरील सर्वश्री प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे, नितीन गडकरी, अटलजी, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, उमा भारती अश्या नेत्यांच्या संपर्कात येऊ लागले होते. स्थानिक पातळीवर डॉ अविनाश आचार्य, गुणवंतराव सरोदे, चंद्रकांत मेंडकी, एकनाथराव खडसे या भाजपा नेत्यांची साथ होतीच. याच काळात भाजपच्या आंदोलने, मोर्चे, सभा, रथयात्रा यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते आणि मोर्चे, आंदोलने हा स्थायीभाव असलेल्या गिरिशभाऊ यांनी शिर्षस्थ नेत्यांचे लक्ष वेधून घेतले.

१९९० च्या विधानसभा निवडणुकीत गिरिषभाऊंनी भाजपतर्फे तिकिटाची मागणी केली होती पण तिकीट मिळण्याची मिळाले तरी निवडून येण्याची शक्यता धूसरच होती. त्यातच भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आणि युतीत जामनेर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला उमेदवारी मिळण्याचा प्रश्नच नव्हता. १९९० च्या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला.

९०-९५ या काळात गिरीशभाऊंनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली. जामनेर जिल्हा परिषद गट महिला राखीव झाल्याने सौ साधना वहिनींनी निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या आणि विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर जामनेर ग्रामपंचायतीला बहुमताने पॅनल निवडून आले आणि गिरिशभाऊ जामनेरचे सरपंच झाले.

आता पुढील लक्ष्य होते विधानसभा. साधना वहिनी जिल्हा परिषद सदस्य आणि गिरिषभाऊ सरपंच ! राहायला जामनेरला. तालुक्यातील नागरिकांना शासकीय कामांसाठी जामनेरला यावेच लागते. गरीब, अशिक्षित, वृद्ध नागरिक सकाळपासून भाऊंच्या घरी जमू लागत. भाऊ संबंधित अधिकारी/कर्मचार्‍याला विनंती करून, प्रेमाने सांगून कामे मार्गी लावत असत. काही नाठाळांना त्यांना ’समजेल’ अश्या भाषेत ’समजावून’ सांगत. कुणीतरी आपलं ऐकून घेतो आणि समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो, ज्याला कधीही भेटू शकतो, भेटण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही, असा सामान्य कुटुंबातील तरुण … अशी किर्ती पसरत गेली. मात्र पेशाने शिक्षक असलेल्या भाऊंच्या वडिलांना या गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या. त्यांच्या दृष्टीने हे नसते उपद्व्याप होते. दादा, अर्थात भाऊंचे वडील अत्यंत कडक शिस्तीचे होते. कृषी पदवीधारक होते. आपल्या मुलाने शिकून चांगली नोकरी करावी, नसेल तर घरची बागायत शेती सांभाळावी एव्हढीच माफक अपेक्षा होती त्यांची.

पण सतत मित्रांच्या गराड्यात, लोकांमध्ये रमणार्‍या गिरिषभाऊंचा तो पिंडच नव्हता. १९९५ पर्यंत गिरीष महाजन हे नाव तालुक्यातील सर्वांना माहीत झाले होते. कमावलेल्या शरीरयष्टीला आक्रमकपणा, देखणेपणा आणि कार्याची जोड यामुळे जनतेत, विशेषतः तरुणांमध्ये गिरीश महाजन या नावाची लोकप्रियता वाढत होती.

१९९५ ला अपेक्षेप्रमाणे ईश्वरलाल जैन उर्फ बाबूजी विरुद्ध गिरीश महाजन अशी लढत झाली. बाबूजींचे सोन्याचांदीचे व्यापारी म्हणून पिढीजात वलय, दोन वेळेस आमदार म्हणून अनुभव, स्वच्छ प्रतिमा आणि समोर नवखा, सामान्य शिक्षकाचा मुलगा… सुरुवातीला एकतर्फी वाटणारी लढत हळूहळू बाबूजींसाठी कठीण होत गेली आणि शेवटी गिरीश महाजन यांनी बाजी मारली आणि १९९५ ला भाऊंचा विधानसभेत प्रवेश झाला. त्यानंतर सहा टर्म आमदार, मंत्री, संकटमोचक म्हणून त्यांनी केलेले कार्य, पाडलेली छाप, विशेषतः रुग्णसेवा सर्वांना परिचित आहेच.

उपग्रह अवकाशात जातांना सगळ्यात जास्त संघर्ष हा सुरुवातीला गुरुत्वाकर्षण कक्षा पार करेपर्यंत असतो, त्यानंतरच्या समस्या त्याने गाठलेली उंचीच सोडवते. हे उदाहरण आपल्या क्षेत्रात उच्च स्थान गाठलेल्या अनेकांप्रमाणे गिरिशभाऊ यांनादेखील लागू पडते. यात एक मोठा फरक आहे… राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना दर पाच वर्षांनी परीक्षेला सामोरे जावे लागते असे नव्हे, पाच वर्षांच्या काळात देखील त्यांना अनेक परीक्षा, कसोटीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते.

विकासाच्या अनुशेषाला संधीत परावर्तित केले

१९९५ च्या पूर्वी जामनेर तालुका विकासाच्या दृष्टीने मागासलेला होता. तालुक्याचा भौगोलिक विस्तार अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे लहानमोठ्या तलाव, धरणांसाठी भरपूर नैसर्गिक साईट्स उपलब्ध होत्या. काही सिंचन प्रकल्प मंजूर होते पण निधीअभावी रखडले होते. रस्त्यांची तर अवस्था दयनीय म्हणावी अशीच होती. गिरीश भाऊंपुढे या क्षेत्रातील अनुशेष भरून काढण्याची संधी होतीच पण आव्हानही होते. ९५ ला युतीची सत्ता, पर्यायाने सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि त्यानंतर सलग मिळालेल्या आमदारकी मुळे अनेक योजना हाती घेऊन, नियोजनबद्ध रीतीने पूर्ण देखील करता आल्या.
सिंचन आणि रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्याने आपसूकच शेती उत्पादन व त्या अनुषंगाने व्यापार वाढला. रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या.
तालुक्यात सहकारी तत्वावर साखर कारखाना, स्टार्च फॅक्टरी, रम फॅक्टरी असे कारखानदारीतील प्रयोग अयशस्वी झाल्यामुळे कारखानदारी रुजू शकली नाही. सुप्रीम इंडस्ट्रीज वगळता मोठ्या प्रकल्पाची जामनेरकरांना अद्याप प्रतीक्षा आहे. जामनेरजवळ आकाराला येत असलेल्या मुळे ही प्रतीक्षा लवकरच संपेल अशी आशा आहे.

राजकीय स्थैर्य आणि विकास याचा अत्यंत घनिष्ट संबंध असतो याचे ठळक उदाहरण म्हणजे गिरीश महाजन यांचे सलग विजय आणि जामनेर विधानसभा मतदारसंघात झालेली विकासकामे. याशिवाय विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे जामनेर गाव हिंदू मुस्लिम दंग्यांसाठी कुप्रसिद्ध होते. हळूहळू ती ओळख पुसण्यात आणि धार्मिक सलोखा निर्माण होण्यात केलेले प्रयत्न आणि त्याला जनतेने दिलेला प्रतिसाद यामुळे जामनेरची आर्थिक भरभराट होण्याकडे वाटचाल सुरू आहे. जाती धर्मात सलोखा टिकवल्या शिवाय, वृद्धिंगत केल्याशिवाय, प्रगती नाही हे जामनेरकरांना पटले आहे.

दंगलीत संधी मिळाली कि गिरिशला कापून टाकायचं अश्या टोकाच्या वैर भावनेपासून आज मुस्लिम मोहल्ल्यात कमळाला बहुमत मिळेपर्यंत हा ३०-३५ वर्षांचा प्रवास कष्टसाध्य आणि विस्मयकारक तर आहेच शिवाय तो समाजशास्त्र आणि राज्यशास्त्राच्या क्षेत्रातील विध्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा विषय होऊ शकतो.

विकासापासून वंचित असलेल्या मतदारसंघात अनेक लहानमोठे सिंचनाचे प्रकल्प, रस्ते-पूल यांची शेकडो कामे पूर्ण करून मतदारसंघाचा कायापालट, भाजपा सारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे आमदार असूनही मुस्लिम बहुल मतदान केंद्रांवर भाजपला मिळणारे मताधिक्य, जातीय व धार्मिक सलोखा वाढीसाठी केलेले प्रयत्न, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पंचायत, सहकार क्षेत्रात सर्व जातीधर्माच्या कार्यकर्त्यांना संधी देऊन साधलेले सोशल इंजिनिअरिंग, सर्वसमावेशक व बेरजेचे राजकारण… या रणनितीची गिरिशभाऊ यांच्या राजकीय यश व उन्नतीमागे महत्वपूर्ण भूमिका आहे.

निवडून आल्यावर, सत्ता मिळाल्यावर अनेक गोष्टी सोप्या होतात पण अधिक सजग राहावे लागते, जबाबदारी देखील वाढलेली असते, उक्ती आणि कृतीवर विरोधक, मिडिया वॉच ठेवून असतात, विरोधकांशी तर लढावे लागतेच, स्वकीयांवर देखील ’लक्ष’ ठेऊन असावे लागते. मिळालेले यश, सत्ता टिकवून ठेवणे हे निवडून येण्यापेक्षा आव्हानात्मक असते. गेल्या २५-३० वर्षातकिरकोळ अपवाद वगळता गिरीश भाऊंच्या पॅनलनी स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार, शिक्षण क्षेत्रातील जवळपास सर्वच निवडणुकीत विजय मिळवला आहे.

शब्दशः अर्ध्या रात्री कुठल्याही कामासाठी ज्याचे दार सर्वसामान्य व्यक्ती ठोठावू शकते अश्या गिरीश भाऊंच्या राजकीय प्रवासात एक दोन नाही तर अनेक योग कसे जुळून आलेत आणि त्यांना कसा लाभ झाला हे पाहू गेल्यास नियती आपली नेपथ्यरचना कशी करत होती ते लक्षात येते.

१९८० च्या निवडणुकीत विद्यमान आमदार गजाननराव गरुड यांचा पराभव होणे.

ईश्वरलाल जैन यांच्या रूपाने अल्पसंख्याक व्यक्ती आमदार म्हणून निवडून येण्याचा पाया घातला गेला.

१९८५ ला विद्यमान आमदार ईश्वरलाल जैन यांचे तिकीट कापले जाणे आणि डॉ सुरेश पाटील यांचा पराभव व अलिप्तता.

बाबूसिंग राठोड या मतदारसंघाबाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी मिळून ते निवडून आले पण संपर्का अभावी मतदारसंघावरील कॉंग्रेस पक्षाची पकड सैल झाली.

१९८५ ला भाजपच्या तिकिटावर पराभूत झालेले मराठा समाजाचे डॉ सुरेश मन्साराम पाटील हे त्यानंतर पक्षात फारसे सक्रिय नव्हते. अन्यथा १९९५ च्या निवडणूकित ते तिकिटासाठी दावेदार असू शकले असते.

१९९० ला भाजप सेना युतीत जामनेर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येणे, प्रल्हादराव पाटलांची (उपरा उमेदवार) एन्ट्री होणे आणि शिवसेनेचा उमेदवाराचा पराभव होणे या बाबी योगायोग म्हणूनच गणल्या जाणार्‍या आहेत. यातच, ईश्वरलाल जैन यांची जामनेर मधील जाहीर झालेली उमेदवारी रद्द करून त्यांना जळगावमधून लढावे लागले. शिवसेना उमेदवाराचा विजय झाला असता तर पुढील निवडणुकीत शिवसेनेने भाजपला हा मतदारसंघ सोडला नसता. तसेच, ईश्वरलाल जैन यांनी जामनेर मधून निवडणूक लढवली असती तर त्यांचा विजय निश्चित होता आणि मंत्रीपद देखील मिळाले असते पर्यायाने मतदारसंघावरील पकड घट्ट झाली असती आणि पुढील १९९५ च्या निवडणुकित गिरीश महाजन यांना निवडून येणे अवघड झाले असते, कदाचित पुन्हा ईश्वरलाल जैन हेच निवडून आले असते. मात्र असे न झाल्यामुळे गिरीश महाजन यांची विधानसभेत एंट्री झाली.

१९९९ च्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी वेगळी चूल मांडली. एकेकाळी भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढलेले डॉ सुरेश मन्साराम पाटील यांना कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिली व मतांची विभागणी होऊन त्याचा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ईश्वरलाल जैन यांना बसून गिरिश महाजन यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. यात ईश्वरलाल जैन यांचे राजकीय विरोधक म्हणून सुरेशदादा जैन यांनी देखील वेळोवेळी गिरिशभाऊ यांना ’बळ’ पुरविले हेही महत्त्वाचे.

गिरीष भाऊंनी कापसाला भाव मिळावा यासाठी केलेले उपोषण याचा भाजपला राजकीय लाभ झाला आणि राज्यस्तरावर नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर या उपोषणाची दखल घेतली गेली.

राजकीय क्षेत्रात दीर्घ प्रवासात कुठल्याही नेत्यांना, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मोठी किंमत मोजावी लागते व ती म्हणजे वेळेची. तशी किंमत भाऊंना, (स्व.) दादांना, सौ साधना वहिनी, प्रिया आणि श्रेया यांनी देखील मोजली आहे. राजकीय क्षेत्रात करियर करणार्‍या व्यक्तीला सार्वजनिक कार्याची आवड (किंबहुना ’खाज’) असतेच पण बर्‍याच वेळा कुटुंबियांची, विशेषतः ज्या कुटुंबात राजकारणाचा वारसा नाहीय त्या कुटुंबातील सदस्यांची फरफट होते. सामाजिक, राजकीय परिवार विस्तारतांना कुटुंबातील सदस्यांना वेळ देता येत नाही आणि हा बॅलन्स साधतांना कसरत करावी लागते. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळाल्याशिवाय राजकीय किंवा कुठल्याही क्षेत्रात व्यक्ती मोठी उंची गाठू शकत नाही आणि या बाबतीत सौ साधना वहिनींनी दिलेली साथ अत्यंत महत्वाची आणि मोलाची आहे.

प्रयत्न आणि संघर्षाला नियतीची साथ लाभलेल्या गिरिशभाऊ यांचा प्रगतीचा आणि लोकप्रियतेचा आलेख सतत उंचावतच आहे आणि तो चढता ठेवणे, किमान घसरू न देणे हे अधिक आव्हानात्मक आहे.

दांडगा जनसंपर्क हा खरेतर वापरून गुळगुळीत झालेला शब्द. पण गिरीश भाऊंसोबत जळगाव जिल्ह्यात, जामनेर तालुक्यात त्यांच्यासोबत एक दिवस घालवल्यावर या शब्दाचा अर्थ खर्‍या अर्थाने उमगतो. लोकप्रियता, कार्यकर्त्यांची फौज, अतुलनीय फिटनेस, राज्यस्तरावरील नेते म्हणून तयार झालेली ओळख, दिल्लीश्वरांचा संपादन केलेला विश्वास आणि संकटमोचक म्हणून गेल्या पाच सात वर्षात निर्माण झालेली प्रतिमा, मतदारसंघातील सोडवलेल्या समस्या, कुठल्याही भ्रष्टाचार, घोटाळ्याचे आरोप न होता सांभाळलेले महत्वाच्या खात्यांचे मंत्रीपद, अव्याहत सुरू असलेली रुग्णसेवा, पुढील पिढी राजकीय क्षेत्रापासून अलिप्त असणे, मूळ आक्रमक स्वभावाला घातलेली मुरड… या व अश्या अनेक जमेच्या बाजू असल्या तरी गिरीष भाऊंना विरोध देखील लक्षणीय आहे.
कायम सजग आणि ’इलेक्शन मोड’ वर असलेल्या भाऊंना आगामी निवडणुकीत मात देणे हे आजतरी कठीण दिसत आहे. भाऊंपुढे आता आव्हान आहे ते मताधिक्य वाढवण्याचे.

जळगाव जिल्ह्यात…

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मते… १ लाख मतांचा टप्पा पार करणारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार… सलग सहा विजयासह एकनाथराव खडसे यांच्यासह संयुक्तपणे दुसर्‍या स्थानावर… (सात विजयासह सुरेशदादा जैन पहिल्या स्थानावर) असे विक्रम त्यांच्या नावे असले मताधिक्याच्या बाबतीत जिल्ह्यातील पहिल्या पाचात अद्यापही त्यांचा समावेश नाही. पण तोही विक्रम येत्या काळात ते प्रस्थापित करतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बाय द वे… जळगाव जिल्ह्यातील किमान पाच विधानसभा निवडणूक लढवलेल्या व आयुष्यात एकही पराभव न अनुभवलेल्या तीन नेत्यांच्या यादीत गिरिशभाऊ महाजन यांचा समावेश होतो. इतर दोघे नेते आहेत एकनाथराव खडसे आणि प्रतिभाताई पाटील !

आज भाऊंचा ६३ वा वाढदिवस, पण त्यांचा फिटनेस, कामाची क्षमता, उत्साह बघून तरूणांनीही त्यांच्याकडून स्फूर्ती घ्यावी असेच हे राजबिंडे व्यक्तिमत्त्व आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात पुढील उंची गाठण्यासाठी, खान्देशच्या विकासासाठी (पक्षी – मुख्यमंत्री पदासाठी) भाऊंना निरामय दीर्घायुष्याच्या मनापासून शुभेच्छा!

अभियंता एम. एम. पाटील
नाशिक
मोबाईल ८९७५७६९५३०

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content