भरधाव पिकअपने चौघांना उडविले : दोघांचे पाय निकामी, तर दोन जखमी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगावकडुन बुलढाण्याच्या दिशेने जाणार्‍या भरधाव पिकअपने शहरातील महाराणा प्रताप चौकातील श्री. दत्त मंदिरासमोर असलेल्या चौघांना जोरदार धडक दिली. या धडकेत चौघांपैकी दोघांचे पाय गुडघ्यापासुन निकामी झाले असुन दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास भडगावच्या दिशेकडून बुलढाण्याकडे एम. एच. बी. एम. ७९४३ ही पिकअप भरधाव वेगाने जात असतांना ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने शहरातील महाराणा प्रताप चौकात श्री. दत्त मंदिरासमोर बसलेल्या चौघांना जोरदार धडक बसली.

यात वसंत भाईदास पाटील (वय – ४२) रा. सुरत, विनोद पाटील (५०, रा. पाचोरा), अमोल वाघ (वय – २७, रा. पाचोरा ) व कुंदन परदेशी (वय – १७ रा. पुनगाव ता. पाचोरा) या चौघांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, या धडकेत वंसत पाटील व विनोद पाटील यांचे गुडघ्यापासुन दोन्ही पाय निकामी झाले आहेत. तर, उर्वरित दोघे जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी घटनास्थळी दाखल होवून त्यांच्या व सहकार्यांच्या मदतीने जखमींना तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिकअपच्या ड्रायव्हर व क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content