भांडवल बाजारातील पडझडीत गुंतवणूकदारांचे एक लाख कोटींचे नुकसान

मुंबई वृत्तसंस्था । कोरोनाची दुसरी लाट आणि राजकीय अस्थिरतेने भांडवली बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी बाजारात गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवला. यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये ४५० अंकांची घसरण झाली होती. दिवसअखेर सेन्सेक्स ३०० अंकांच्या घसरणीसह ३७७३४ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९६ अंकांच्या घसरणीसह १११५३ अंकांवर स्थिरावरला. आजच्या पडझडीत गुंतवणूकदारांचे किमान एक लाख कोटींचे नुकसान झाले.

बाजारात आज सकाळपासून विक्रीचा ट्रेंड दिसून आला. बँका, वित्त संस्था, टेलिकॉम, स्थावर मालमत्ता, ऑटो या क्षेत्रात प्रमुख शेअरची विक्री झाली. आज स्माॅल कॅप शेअरला देखील मोठी झळ बसली. बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स २ टक्के घसरला.

टेलिकॉममधील एजीआर शुल्काची १० टक्के रक्कम भरण्याची टांगती तलवार असलेल्या वोडाफोनच्या शेअरमध्ये ११ टक्के घसरण झाली होती. टाटा कम्युनिकेशन, भारती एअरटेल, आयटीआय, भारती इन्फ्रा आदी शेअर घसरसणीसह बंद झाले. धातू उद्योगातील हिंदाल्को, नाल्को, हिंदुस्थान कॉपर, हिंदुस्थान झिंक या शेअरमध्ये घसरण झाली.

वाहन क्षेत्रात टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, अशोक लेलँड, एस्कॉर्ट, टीव्हीएस मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा या शेअरमध्ये घसरण झाली. सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी २१ शेअर घसरणीसह बंद झाले. ज्यात बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह, एचयूएल, पॉवरग्रीड, एचडीएफसी, रिलायन्स, ओएनजीसी, ऍक्सिस बँक, एल अँड टी, नेस्ले यांचा समावेश आहे. मात्र आयटी सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरला आज मागणी दिसून आली. एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्रा हे शेअर वधारले.

जगभरात अनलॉकमुळे कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. युरोपामध्ये या संसर्गाचा उद्रेक पुन्हा एकदा झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले आणि गुंतवणूकदार भयभीत झाले. यामुळे समभाग विक्रीचा धडाका गुंतवणूकदारांनी लावला आणि परिणामी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८११.६८ अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील २५४.४० अंकांनी खाली आला. गुंतवणूकदारांचे तब्बल ४.२३ लाख कोटी रुपये बुडाले होते.

सोमवारी दिवसअखेर सेन्सेक्स २.०९ टक्के कोसळत ३८,०३४.१४ या पातळीवर स्थिरावला. निफ्टी २.२१ टक्के घसरत ११,२५०.५५ वर बंद झाला. सेन्सेक्सच्या ३० कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचा समभाग सर्वाधिक ८.६७ टक्के घसरला. त्यापाठोपाठ भारती एअरटेल, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, महिंद्र अॅण्ड महिंद्र, मारुती, अ्रक्सिस बँक व बजाज फायनान्स यांचे समभाग खाली आले. सेन्सेक्सच्या ३० कंपन्यांपैकी केवळ कोटक बँक, इन्फोसिस व टीसीएस हे तीन समभागच सकारात्मक पातळीवर बंद झाले होते.

Protected Content