बॉलीवूड नशाबाजी :: ‘मला माहिती नाही, मी याकडे लक्ष देत नाही – शरद पवार

मुंबईः वृत्तसंस्था । कृषी विधेयक आणि मराठा आरक्षणसारख्या मुद्द्यावर मुंबईत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शरद पवारांना आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावं समोर आली आहेत, यासंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी, ‘मला माहिती नाही, मी याकडे लक्ष देत नाही. आत्महत्या कोणाचीही असो दुःख होतं यात काही वाद नाही. पण एका आत्महत्येवरून गेले तीन महिने देशात इतकी गंभीर चर्चा सुरु आहे. मला भीती आहे ती म्हणजे दिवसाला १० ते १५ तर महिन्याला ५० ते ६० शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करणं मला योग्य वाटत नाही,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे प्रकरण लागले आहे. सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर आता रोज नवनवीन कलाकारांची नाव समोर येऊ लागली आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहांत बहुचर्चित कृषी विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कृषी विधेयकांच्या मुद्द्यावरून केंद्रावर टीका केली असून शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनालाही पाठिंबा दर्शवला आहे. नव्या शेती कायद्यामागचा हेतू वाईट नसला तरी केंद्राच्या कृषी धोरणात विरोधाभास असल्याचं मत त्यांनी या वेळी व्यक्त केलं. त्याचबरोबर कांदा निर्यातीवरही त्यांनी लक्ष वेधलं. एकीकडे तुम्ही बाजारपेठ खुली करता, मग कांदा निर्यातीवर बंदी का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही शरद पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. आरक्षण देण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. आरक्षण टिकवण्यासाठी सुप्रीम कोर्टात अपील करण्याची गरज होती. त्यानुसारचं मराठा आरक्षण स्थगितीविरोधात सरकारने सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल केला. असं ते म्हणाले आहेत. तसंच, मराठी आरक्षणप्रकरणी लवकरात लवकर अपील करण्याची गरज असल्यानं दिल्लीला जाता आलं नसल्याचंही ते म्हणाले.

Protected Content