भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत सदस्यावर चॉपरने वार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील शिरसोली येथील प्रशांत हॉटेल येथे ग्राहक व हॉटेल मालकात सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली म्हणून ग्रामपंचायत सदस्यांवर चॉपर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शनिवारी २२ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. जखमीस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

नितीन अर्जून बुंधे (वय-३४) रा. शिरसोली ता. जि.जळगाव असे जखमी झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे.   याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ जळगाव रस्त्यावर असलेल्या प्रशांत हॉटेलमध्ये जेवणाचे बिल देण्यावरून हॉटेल मालक आणि एका ग्राहकात शनिवारी २२ एप्रिल रोजी रात्री १० वाजता  वाद सुरू होता. ग्राहकाच्या म्हणण्यानुसार, भाजीचा रस्सा पाणी पाणी दिला. तरी देखील हॉटेल मालकाने बिल लावलं यावरून हा वाद पेटला.

 

हा वाद तेथे असलेल्या ग्रामपंचायत सदस्य नितीन बुंधे यांनी पाहिला. त्यांनी दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने ग्राहक असलेल्या व्यक्ती सोबत एका व्यक्तीने त्याच्या दोन मित्राला बोलावून घेतले.  दोन्ही जणांनी नितीन बुंधे याच्यावर पाठीत चॉपरने वार करून लाकडे दांडक्याने जबर मारहाण केली. नितीन बुंधे रक्तबंबाळ स्थितीत खाली पडताच एकच धावपळ उडाली.

 

नागरिकांनी त्यास जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनेची माहिती पोलीस घेत असून संशयित मारेकरी कोण आहेत याबद्दल पोलीस विचारपूस करीत आहेत.  हाॅटेल मध्ये व बाहेर सीसीटीव्ही फुटेज आहे. अद्यापपर्यंत एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content