शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांच्या घोळक्यातून भावी उमेदवारच गायब!

जळगाव प्रतिनिधी| – युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त जळगाव जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांची विश्रामगृहात बैठक जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, नेते बैठकीला उपस्थित असताना जळगाव शहर विधानसभा मतदार संघाचे भावी उमेदवार सुरेशदादा जैन व त्यांचे जवळचे नगरसेवक मात्र अनुपस्थित दिसून आले. दिग्गज नेते आलेले असताना उमेदवारी जाहीर करणारेच नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी जळगावात वातावरण तापू लागले आहे. शिवसेनेतर्फे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी उमेदवारी देखील जाहीर केले आहे. शिवसेनेचे युवा नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे राज्यभर जन आशिर्वाद यात्रा काढत असून पहिल्या टप्प्याची सुरुवात दि.१८ रोजी जळगावातून होणार आहे. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी रविवारी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विश्रामगृहात बैठक बोलाविण्यात आली होती. शिवसेनेच्या या प्रमुख बैठकीसाठी सर्वच नेते हजर असताना उमेदवारी जाहीर करणारे माजी मंत्री सुरेशदादा जैन हे मात्र दिसून आले नाही. एकीकडे शहरासाठी उमेदवारी जाहीर करायची आणि दुसरीकडे प्रमुख नेत्यांना डावलून पक्षापासून लांब राहायचं असा काहीसा बेत सुरेशदादा जैन यांचा दिसून आला. शिवसेनेचे नेते असले तरी आजवर त्यांनी शिवसेनेच्या कार्यालयात कमी आणि स्वतःच्या घरीच जास्त बैठका घेतल्या आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे कार्यालयात नेहमी भेट देतात परंतु जळगावात मात्र चित्र उलट आहे. शिवसेनेकडून सुरेशदादांसह नावे चर्चेत असलेले इतर नगरसेवकही बैठकीला दिसून आले नाही त्यामुळे पक्ष महत्त्वाचा की स्वतःचे इतर कार्यक्रम महत्त्वाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते देखील याबाबत चर्चा करताना दिसून आले.

Protected Content