चौघुले प्लॉट येथे दोन गटात हाणामारी; दोन जखमी, पाच जणांना अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनीपेठ हद्दीतील चौघुले प्लॉट येथे सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पूर्ववैमन्यस्यातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. यात दोन जखमी झाले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.  याप्रकरणी दोन्ही गटाच्या १० जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील चौघुले प्लॉटमधील रहिवासी दीपक दत्तू चौधरी हा लहान भाऊ मनोज उर्फ काल्या सोबत पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी जात होता. यावेळी हनुमान मंदिराजवळ हितेश संतोष शिंदे, संतोष रमेश शिंदे, आकाश संजय मराठे, संजय मराठे, माया उर्फ विक्की, पिंटू मराठे सर्व रा. चौघुले प्लॉट यांनी दीपक व त्याच्या भत्तवाला अडवित तुमचा जामीन कसा झाला?  असे म्हणत हितेशने त्याच्या हातातील लोखंडी धारदार पट्टीने दीपकच्या छातीवर वार केला परंतु दीपकने हा वार चुकविला. त्यानंतर संतोष व पिंटू या दोघांनी हातातील लाकडी दांडूक्याने दीपकच्या पायावर तर संजय मराठेने लोखंडी रॉड दीपकच्या डोक्यात मारुन त्याला जखमी केले. दीपकचे वडील व भाऊ मनोज हे दोघे त्याला वाचविण्यासाठी आले असता, त्यांना देखील मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दीपकच्या फिर्यादीवरुन हितेश शिंदे, संतोष शिंदे, आकाश मराठे, संजय मराठे, माया उर्फ विक्की, पिंटू मराठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या तक्रारीत म्हटले आहे की, हितेश शिंदे हा चौघुले प्लॉटमधील प्रसार किरणाजवळ उभा होता. यावेळी नानू उर्फ  बोबड्या व मनोज उर्फ काल्या हे दोघ त्याच्याजवळ आले. त्यांनी हितेशला तू आमचा पहिला जामीन रिजेक्ट केला होता. तुला जास्त झाले काय? काल तू वाचला असे म्हणत हितेशला मारहाण केली. यावेळी दत्तू व दीपकने त्याच्या हातातील काठीने हितेशच्या हाता-पायावर मारीत त्याला जखमी केले. दरम्यान संतोष मराठे हे याठिकाणी आले असता त्यांना देखील मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या खिशातील ३६० रुपये व मनपाच्या चार पावत्या गहाळ झाल्या आहेत. याप्रकरणी हितेश शिंदे याच्या फिर्यादीवरुन मनोज चौधरी, दीपक चौधरी, दत्तू चौधरी, राज चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील एका गटातील सदस्यांचा शनिवारी सायंकाळी जामीन झाला होता. जामीन झाल्यानंतर आज हे दोघ गट समोरासमोर भिडले. दोघ गटातील १० जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी हितेश संतोष शिंदे, संतोष शिंदे, आकाश मराठे, संजय मराठे माया उर्फ विक्की, पिंटू मराठे यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा तर दुसर्‍या गटातील दत्तू चौधरी यांना ताब्यात घेतले असून दीपक चौधरी याच्या डोक्याला व पायाला तर मनोज चौधरीच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्यामार्गदर्शनाखाली दिनेशसिंग पाटील, मुकूंद गंगावणे, राहूल पाटील, राहूल घेटे, अनिल कांबळे, सलीम पिंजारी, रविंद्र पाटील यांच्या पथकाने संशयितांना अटक केली.

 

 

 

Protected Content