भवरलाल जैन यांच्या श्रद्धावंदन दिनी उद्या ‘भक्ती संगीत संध्या’चे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार मूल्ये रूजविणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या श्रद्धावंदन दिनी शनिवारी २५ फेब्रुवारी विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्या’ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘भक्ती संगीत संध्या’ भाऊंच्या उद्यानामधील अॅम्पी थॅएटर येथे संध्याकाळी ६ वाजता होईल.

 

 

यामध्ये विद्यार्थ्यांकडून किबोर्डसह इतर वाद्यांच्या साथ संगतीने गायनातून भवरलाल जैन यांचे प्रेरणादायी स्मरण केले जाईल. कार्यक्रमावेळी अनुभूती निवासी स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन  यांची प्रमुख उपस्थिती असेल.

 

अनुभूती निवासी स्कूल निसर्गाच्या सान्निध्यात शंभर एकर परिसरात विस्तारली आहे. याठिकाणी इयत्ता ५ व ते ६ वी मधील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी डे बोर्डींग तर इयत्ता ७ वी ते १२ पर्यंत पूर्ण निवासी आहे. ‘इथे शिकणारा विद्यार्थी नोकरी मागणाऱ्यापेक्षा तो नोकरी देणारा ठरावा’ या विचारांनी या शाळेची वाटचाल सुरू आहे. स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अनुभूती स्कूल कडे पाहिले जाते. विद्यार्थ्यांशी भवरलाल जैन सुसंवाद साधायचे. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकडे परिपूर्ण लक्ष असायचे हाच संस्कार आजही अनुभूती निवासी स्कूलमध्ये तंतोतंत पाळला जातो. या श्रद्धेपोटी विद्यार्थ्यांनी विशेष भक्ति संगीत संध्या चे आयोजन केले आहे. भक्ती संगीत संध्यामध्ये प्रेम, आपुलकी व सामाजिक बांधिलकीतून संवेदनशील समाज निर्मितीसाठीचे योगदान अधोरेखित केले जाणार आहे.  गीतांच्या शब्दांमधील अर्थासह श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या कार्याचे स्मरण केले जाईल. विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट शैलीमध्ये निवेदनही सादर केले जाईल. या भक्ती संगीत संध्येला उपस्थिती राहून नागरिकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन अनुभूती निवासी स्कूलच्या व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content