भरधाव ट्रक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; दोन जण जखमी

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी। पहूर चिलगाव रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरने मोटरसायकला दिलेल्या धडकेत १ जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी सांगवी गावाजवळील पूलानजीक घडली. या अपघातात एका बकरीचाही मृत्यू झाला असून दोन बकऱ्या जखमी झाल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे , पहूर येथून दोन किमी अंतरावर असलेल्या सांगवी गावाजवळ उभारण्यात आलेल्या चुकीच्या पुलामुळे समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरने ( एमएच १९, ३१५३ ) पहूर कडून चिलगावकडे जाणाऱ्या मोटर सायकलला जोरदार धडक दिली .यात मोटर सायकलस्वार निवृत्ती उखर्डू सुतार ( वय-५० ) रा. चिलगांव यांचा जागीच मृत्यू झाला. मयत निवृत्ती सुतार हे कापुसवाडी (ता. जामनेर ) येथून त्यांच्या बहिणीला भेटून आपल्या मोठ्या भावासह मोटरसायकलने (एमएच १९ बीके ४८८७ ) चिलगांवकडे जात असताना समोरून पहूरकडे भरधाव वेगात येणाऱ्या स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाले तर त्याचे मोठे भाऊ वामन उखर्डू सुतार (वय ५५ ) रा. चिलगांव यांच्यासह रस्त्याच्या कडेला बकऱ्या चारणाऱ्या जामराबाई बाबु तडवी , रा सांगवी या जखमी झाल्या असून त्या चारत असणाऱ्या बकरं पैकी एक बकरी जागीच ठार झाली तर दोन बकऱ्या जखमी झाल्या आहेत . जखमींना तत्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल आले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले . घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक घटनास्थळी दाखल झाले . या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत . मयत निवृत्ती उखर्डू सुतार यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार असून त्यांच्या अकाली मृत्यूने त्यांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला . दरम्यान पहूर – चिलगांव मार्गावर सांगवी जवळ नाल्यावर बांधण्यात आलेल्या चुकीच्या पुलामुळे सदर दुर्घटना घडली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले .संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पुलाची उभारणी करून शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता स्वतःच्या फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीने पुल उभारला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे .या पुलामुळे दोन वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते .

Protected Content