भरडधान्य खरेदी अंतर्गत १२६४ शेतकऱ्यांनी केली नोंदणी

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – राज्य शासनाच्या सन २०२१-२२ रब्बी हंगामातील भरडधान्य खरेदी योजनेतर्गत शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत ३० एप्रिल पर्यत आहे. आतापर्यत १ हजार २६४ जिल्ह्यातील विविध केंद्रावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

राज्य शासनाच्या किमान आधारभूत किमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम रब्बी २०२१-२२ भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यात १७ केंद्रावर ३० एप्रिल दरम्यान ऑनलाईन नोंदणी केली जात आहे. एनईएमएल या वेब पोर्टलवर आतापर्यत १२६२ शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी आणि मका आदि शेतमाल उत्पादनाची नोंदणी केली आहे. यात सर्वात जास्त जामनेर २२६ तर त्या खालोखाल अमळनेर केंद्रावर १८० शेतकऱ्यांनी ज्वारीसाठी नोंदणी केली आहे.

जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, रावेर, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर तालुका खरेदी विक्री संघ,एरंडोल,जामनेर, पाचोरा, भडगाव, पारोळा, चाळीसगाव शेतकरी सहकारी संघ, बोदवड को-ऑप परचेस सोसायटी, जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक कै.साहेबराव पाटील फ्रुट सेल सोसायटी पाळधी, कोरपावली वि.का.सो. यावल, शेंदुर्णी शेतकरी सह. जिनिंग प्रेसिंग ली. अशा १७ केंद्रावर भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केली जात आहे.

डाळ वर्गीय उत्पादनाची खरेदी
तूर खरेदीची मुदत ३१ मार्च रोजी संपली असून मुदतीअखेर ९९.५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या ७३३९ शेतकऱ्यांकडून १ लाख १५ हजार ७३ क्विंटल हरबरा खरेदी करण्यात आला आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा 

जिल्ह्यात राज्य शासनाच्या मार्केटिंग फेडरेशन द्वारा आधारभूत किमत भरडधान्य खरेदी योजनेची ऑनलाईन नोंदणी ३० एप्रिल पर्यंत मुदत आहे. शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किमत भरडधान्य खरेदी योजनेतर्गत ज्वारी, बाजरी आणि मका आदी उत्पादनाची ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणी करतेवेळी सद्यस्थितीतील ज्वारी, बाजरी, मका आदी उत्पादनाची नोंद असलेला ७/१२ उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड झेरॉक्स, मोबाईल क्रमांक आदी माहिती तालुक्यातील जवळच्या भरडधान्य खरेदी ऑनलाईन नोंदणी करावी.
गजानन मगरे, जिल्हा विपणन अधिकारी, जळगाव

Protected Content