मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाचे रुपांतर संधीत करण्याची हीच ‘योग्य’ वेळ असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या भक्तांनी ‘मोदी उवाच’चा अनर्थ केला. मोदींनी संधीसाधूची एकदा शाळा घ्यावी हेच बरे, अशी टीका मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखात करण्यात आली आहे.
अग्रलेखात म्हटलेय की, पंतप्रधान मोदी यांनी संकटांना संधीमध्ये बदलण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे म्हटले. आम्हाला असे वाटत होते की, संकट म्हणजे कोरोना आणि संधी म्हणजे स्वावलंबन. भाजप नेत्यांनी पंतप्रधान यांच्या वक्तव्याला खर्या अर्थाने समजून घेतले आणि कोरोना संकटाला एक संधी मानून राजस्थानमधील स्थिर सरकारचे पाय खेचण्यास सुरुवात केली, अशी टीका शिवसेनेने केली आहे. ‘संकटाचे रुपांतर संधीत करण्याची हीच ‘योग्य’ वेळ असल्याचे पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. हे संकट म्हणजे को रोना आणि संधी म्हणजे स्वावलंबन असे आम्हाला वाटत होते. पण पंतप्रधानांच्या सांगण्याचा खरा अर्थ भाजपातील नेत्यांनी समजून घेतला आणि त्यांनी राजकीय डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने भाजपवर राजकीय हल्ला करताना ‘सामना’तून हल्लाबोल केला आहे. कोरोनाशी युद्ध सुरु झाले असतानाच भाजपने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटाचे बावीस आमदार फोडले आणि संकटातील संधीचे सोने करुन दाखवले. या बदल्यात शिंदे समर्थकांना काही फुटकळ मंत्रिपदे मिळाली. स्वतः शिंदे यांना केंद्रात मंत्रिपदाचे गाजर दाखवण्यात आले, पण कोरोना संकटामुळे ही गाजराची शेती सुकली आहे. आता या गाजरांचा साठा राजस्थानात पाठवला आहे आणि तिथे संधीचे सोने करण्याचे पिक निघेल काय, यासाठी पेरणी आणि खतांची फवारणीही सुरु झाली आहे, असेही ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.