‘ब्रह्मोस” क्षेपणास्त्र फिलिपिन्सला निर्यातीची भारताची तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । ‘ब्रह्मोस’ हे भारताच्या ताफ्यातील सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. भारत लवकरच हे क्षेपणास्त्र फिलिपिन्सला निर्यात करु शकतो.

पुढच्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्यात एक परिषद होणार आहे. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये ‘ब्रह्मोस’च्या निर्याती संदर्भात महत्त्वाचा करार होऊ शकतो. हा करार प्रत्यक्षात आल्यास फिलिपिन्स हा ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेणारा भारताचा पहिला ग्राहक ठरेल.

‘ब्रह्मोस’ हे भारत आणि रशियाने मिळून विकसित केलेले क्षेपणास् आहे. ब्रह्मोस एरोस्पेसची एक टीम पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये या करारासंदर्भात मनिलाला जाऊ शकते. दोन्ही देशांमध्ये हा करार होण्याआधी काही मुद्दे आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी ही टीम मनिलाला जाणार आहे. फिलिपिन्सच्या लष्कराला जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करणाऱ्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या आवृत्तीचा पुरवठा करण्यात येईल.

“या करारामध्ये काही छोटे मुद्दे आहेत, ते दूर करुन पुढच्यावर्षी होणाऱ्या परिषदेत या कराराला अंतिम मान्यता देण्याचा प्रयत्न आहे” असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. नरेंद्र मोदी आणि रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्या परिषदेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. फेब्रुवारी महिन्यात ही बैठक होण्याची शक्यता आहे. संरक्षणासह अन्य करारही या बैठकीत होतील.

हवेतून जमिनीवर मारा करणारे ब्रह्मोस हे भारताचे सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ३०० किलो वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरातील चिनी युद्धनौका तसेच तिबेट आणि शिनजियांगमधील चीनच्या धावपट्टया उद्धवस्त करु शकते.या क्षेपणास्त्राचे वैशिष्टय म्हणजे सुखोई Su-30 MKI या फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते. त्यामुळे ब्रह्मोसमधून होणारा हल्ला अधिका घातक असेल.

चीन बरोबर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने लडाखमध्येही हे क्षेपणास्त्र तैनात केले आहे. “भारत आणि रशिया मिळून या क्षेपणास्त्राचा पल्ला वाढवण्यावर काम करत आहेत. फिलिपन्स म्हणजे तिसऱ्या देशापासून निर्यातीची सुरुवात करणार आहेत” असे रशियाचे राजनैतिक अधिकारी रोमन बाबुशकीन यांनी सांगितले.

Protected Content