जदयूच्या खराब कामगिरीमुळे नितीश कुमार नाराज

 

 

पाटणा : वृत्तसंस्था । नितीश कुमार हे निवडणुकीतील आपल्या पक्षाच्या खराब कामगिरीमुळे नाराज आहेत.

एनडीएला बहुमतापेक्षा अधिक जागा मिळाल्या असतानाही, नितीश कुमारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे म्हटले होते. मात्र, भाजप नेत्यांनी नितीश कुमारांना समजावत सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी राजी केले आहे.

नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे दर्शवल्यानंतर, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यास राजी केले आहे. एवढेच नाही, तर ते पूर्वीप्रमाणेच स्वतंत्रपणे सरकार चालवू शकतील, असे आश्वासनही भाजप नेत्यांनी नितीश यांना दिले आहे.

चिराग पासवानांनी आणि त्यांच्या लोजपाने जदयू आणि नितीश कुमारांना चांगलेच काळजीत टाकले होते. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे, ‘ते (नितीश कुमार) अत्यंत तणावात होते, की चिरागने किमात 25 ते 30 जागांवर जदयूच्या विजयाची शक्यता बिघडवली. आम्ही त्यांना मुख्यमंत्री राहण्यासाठी राजी केले आहे. मात्र, आता भाजप आघाडीतील मोठा भागिदार आहे.’

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जदयूला 43 जागा मिळाल्या आहेत. 2005च्या विधानसभा निवडणुकीनंतर ही पक्षाची सर्वात वाईट कामगिरी आहे. 2015च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने 71 जागांवर विजय मिळवला होता.

Protected Content