बुलढाणा जिल्ह्यात सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी अकोला परिमंडळात येणाऱ्या अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र आगामी २१ ऑगस्टपर्यंत शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या महितीनुसार, अकोला जिल्ह्यात  महावितरणचे उपविभागीय स्तरावर बाळापूर, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, पातूर, अकोट, तेल्हारा,अकोला या ठिकाणी १० वीज बिल भरणा केंद्र सुरु आहेत. सोबतच जिल्ह्यातील ३२ सहकारी पत  संस्थेतही वीज देयक भरण्याची सुविधा आहे. जिल्हयात गाव पातळीवर वीज देयकाची भरणा करण्यासाठी ७६ ठिकाणी ‘महा पॉवर पे’ ची सुविधा आहे. बुलढाणा जिल्ह्यात महावितरणची  २९४ बिल भरणा केंद्र  सुरु राहणार आहेत. यात बुलढाणा, मेहकर, मोताळा, सिंदखेडराजा, लोणार, शेगावसह एकूण १५ उपविभागीय केंद्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ६२ तर  ११९ वॅलेट वीज ग्राहकांच्या सोयीसाठी सुरु राहतील.

वाशीम जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी ४६ वीज बिल भरणा केंद्र या काळात सुरु राहणार आहेत. सोबतच वीज ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरण कडून ऑनलाईन वीज देयकाची भरणा करण्याची सुविधा दिली असून महावितरण ‘मोबाईल अँप’ चा वापर करून वीज ग्राहक आपल्या देयकाची रक्कम भरू शकतात. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची http://www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल अँप  किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. ऑनलाईन वीज देयक भरल्यास वेळ व श्रमाची बचत होईल आणि सोबतच ०.२५% डिजिटल पेमेंट भरणा सूट देखील मिळेल. थकबाकीदार वीज वीज ग्राहकांनी थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून  सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

Protected Content