बीड जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी; रुग्णांची संख्या ९

बीड वृत्तसंस्था । बीडच्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोनाबाधित आढळलेल्या ६५ वर्षीय महिलेचा पहाटे मृत्यू झाला. रविवारी तिच्यासह सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. संबंधित महिला ही मूळची नगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रहिवासी होती. बीडमध्येच त्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला. उपचारादरम्यान आज पहाटे या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ९ वर पोहोचली आहे. आता बीड जिल्ह्यात एकूण आठ कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. बीड जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या २९ स्वॅब पैकी प्रलंबित राहिलेले सात स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये ५ पुरुष तर २ महिलांचा समावेश आहे. त्यामुळेच कोरोनाला रोखण्यास प्रयत्न करणाऱ्या जिल्हा वासियांच्या चिंतेत भर पडली आहे. हे ७ जण १३ मे रोजी मुंबईहून निघाले होते. १४ तारखेला आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे नातेवाईकांकडे आले होते. हे सर्व पिंपळगाव खुडा अहमदनगर येथील रहिवाशी आहेत.

दुसरीकडे काल बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील इटकूर मध्ये १ रुग्ण तर माजलगाव तालुक्यातील हिवरा या गावात १ रुग्ण पॉझिटिव्ह सापडला होता. हे दोघेही मुंबई-पुण्याहून चोरट्या मार्गाने बीडमध्ये आले होते. त्यामुळे बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9 वर पोहोचली. त्यापैकी एका 65 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई पुण्याहून आलेल्यांनी तपासणीसाठी पुढे येऊन संसर्ग टाळावे असे आवाहन बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी केले आहे. गेवराई आणि माजलगाव येथील आढळून आलेले २ रुग्ण चोरट्या मार्गाने बीड जिल्ह्यात दाखल झाल्याचे उघड झाल्यानंतर प्रशासनाकडून माहिती न लपविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content